महिलांवरील अत्याचारांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबईतील नुकत्याच घडलेल्या घटनांवरून हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. भारताच्या कोणत्याही कोपर्यात महिला सुरक्षित नाहीत हेच खरे वास्तव आहे. भारत सरकारच्या राष्ट्रीय अपराध रेकॉर्ड ब्युरोचा अहवाल पाहिला तर अंगावर शहारे येतात. प्रती दिवसाला सहा दलित महिलांवर बलात्कार होत असल्याचे नोंदलेल्या गुन्ह्यांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. अब्रू झाकण्यासाठी आणि जीवाच्या भीतीने दडपलेल्या केसेस लाखोंच्या संख्येत आहेत. मुद्दा सजा करण्याचा किंवा गुन्हा नोंदवण्याचा नाही तर विकृत मानसिकता बदलण्याचा आहे!
मुंबईमधील दोन बातम्यांनी शुक्रवारी सर्वांचे डोळे विस्फारले होते. एक होती चालत्या ट्रेनमध्ये महिलेला मारहाण झाल्याची. ठाणे सीएसटीदरम्यान हा प्रकार घडला तर दुसरी नालासोपारा येथे एका नराधमाने अल्पवयीन मुलीला अतिप्रसंग करण्यासाठी टेरेसवर ओढून नेत असताना स्वतःला वाचवण्यासाठी तिने थेट टेरेसवरून उडी मारली. तिच्या आरडाओरडीमुळे लोक जमा झाले होते आणि तिला चादरीत झेलण्याचा प्रयत्न केला. तिचा जीव वाचला. परंतु, कंबरेत तिला गंभीर इजा झाली आहे. या दोन्ही प्रसंगामुळे कोणालाही संताप अनावर झाल्याशिवाय राहणार नाही. मुंबईच्या लोकलमधील ही पहिली घटना नाही. चालत्या ट्रेनमध्ये बलात्कार झाल्याच्या घटनाही उजेडात आल्या आहेत. त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करण्याचे प्रकारही घडले आहेत. रेल्वे आणि पोलीस प्रशासनाला याबाबत वारंवार सूचनाही देण्यात आल्या आहेत.
मुंबई शहराची वाढती गर्दी, त्यामध्ये होणार्या धक्काबुक्की, मारामार्या, बसयाला न मिळणे, त्यावरून होणारी हाणामारी, कपडे फाटणे, दागिने तुटणे, फोन हरवणे, पाकीट हरवणे, नातेवाईक मागे सुटणे, असे प्रकार रोजचे झाले आहेत. यापेक्षा भयंकर प्रकार म्हणजे मुंबईच्या ट्रेनमध्ये प्रवास करणार्या बायकांना छेडछाडीचा त्रास नेहमीच सहन करावा लागतो. म्हणजे फक्त शिट्या, कमेंट्स, किंवा चाळे करणारे लोक भेटतात असे अजिबात नाही तर तिकिटाच्या रांगेत उभ्या असलेल्या, चुकून जेन्टस डब्यात चढलेल्या किंवा जेन्टस डब्यातून उतरणार्या, प्लॅटफॉर्मवर गाडी पकडण्यासाठी सज्ज असलेल्या मुलीच्या पृष्ठभागाला नाहीतर छातीला हात लावणारेही या गर्दीत अनेक असतात. कधी तर मुलींच्या पार्श्वभागाला मागून किंवा पुढून मुद्दाम चिकटणारे लोकही पाहायला मिळतात. ट्रेनमध्ये चढताना गर्दीत बॅग अडकू नये म्हणून बायका ती पुढे लावतात हे जितके खरे तितकेच चालत्या ट्रेनमधून झुकणार्या आणि लटकणार्यांकडून छातीला स्पर्श होऊ नये यासाठीची ती तरतूद असते हेही खरे आहे. त्यांना छातीवर मारू नये यासाठी त्या बॅग पुढे घेत असाव्यात. असे प्रवासात भरलेली ट्रेन समोरुन जाताना डबा पकडणार्या बायकांना हात लागल्यानंतर रागाने शिव्या देणार्या बायका पाहण्याचाही अनुभवही अनेक वेळा येऊन जातो.
एका ब्लॉगमध्ये वाचनात आले की, पुकार संस्थेमार्फत माटुंग्याच्या गुरूनानक खालसा महाविद्यालयातील 10 विद्यार्थ्यांनी रेल्वेमध्ये होणार्या छेडछाडीबाबत सर्व्हे केला आहे. या सर्व्हेमध्येदेखील त्यांनी या गोष्टींचा आढावा घेतला आहे. सर्व्हे करणारे सर्व विद्यार्थीच होते. त्यातल्या 10 विद्यार्थ्यांपैकी 8 मुली होत्या आणि त्यातल्या 6 जणींना ट्रेनच्या प्रवासात छेडछाड झाली होती. तेव्हा त्यांनी याच विषयावर सर्व्हे करायचा निर्णय घेतला. यातील स्टेला फर्नांडिस सांगते. कॉलेजमध्ये गेल्यावर ट्रेनच्या प्रवासाचा संबंध आला. मैत्रिणींना भेटायला जाताना, फिरायला जाताना किंवा शॉपिंगला जाताना सुरुवातीला ट्रेनचा प्रवास केला. तेव्हा सर्वांनी वेगवेगळ्या सूचना केल्या, मोबाइल, पर्स सांभाळ, घरी लवकर ये, वस्तू हरवू नको वगैरे. पण कोणी ट्रेनच्या प्रवासाता स्वतःला सांभाळ, कोणापासून सांभाळ आणि कसे सांभाळ हे सांगितलेच नव्हते. हे सगळे अनुभव नव्याने घेतले तेव्हा घाबरलोच सुरुवातीला. स्टेलाचे हे वाक्य आपण सुरक्षिततचे जे सल्ले देतो त्यात काय काय बाबी अॅड करायला हव्या याचा विचार करायला लावणार्या आहेत. ब्लॉगच्या निमित्ताने आपण जे वाचतो तेच अनुभवही डोळ्याने पाहतो. ट्रेनमध्ये होणारी धक्काबुक्की, चुकीच्या ठिकाणी हात लागणे, वाईट कमेंट्स करणे, शिट्या आणि अगदी पॅन्टची झीप उघडून किळसवाणे चाळे करणे ते टक लावून बघणे हा ट्रेनचा प्रवास बायकांना नुसता दमवत नाही तर लाजवतो. त्या माणसांबद्दल जेवढी भीती-चीड निर्माण करतो त्याहीपेक्षा जास्त त्रास स्वतःच्या शरीराचा होतो. पण दररोजचा हा त्रास ट्रेनच्या वेळा बदलून कमी होणार नाही, तर अशा गोष्टींविरोधात ‘मोठ्याने बोलून, तक्रार करून, योग्य पद्धतीने व्यक्त होऊन आणि दोषीला शिक्षा करून कमी होईल. हे एकदा तरी करून बघितले पाहिजे. हे त्या सर्व्हे करणार्या प्रत्येक विद्यार्थ्याचे मत आहे.
खरे तर हे रोजचेच आहे, असे म्हणून सोडून देण्याचा विषय अजिबात नाही. प्रत्येक सजग नागरिकांनी याबाबत पाऊल उचलने गरजेचे आहे. सरकार आणि प्रशासन काय करणार यापेक्षा घटना घडत असताना उपस्थित असलेल्या महिला अथवा पुरुषांनी तत्काळ हस्तक्षेप करून जागेवरच अशा नराधमांना शासन करायला हवे तरच जरब बसू शकते. मुंबई शहरात एक काळ असा होता जेव्हा शिवसेना ऐन भरात होती तेव्हा रस्त्यावर असे प्रकार दिसताच शिवसैनिक जागेवरच कानाखाली आवाज काढताना पाहायला मिळायचे. परंतु, हे घडण्यासाठी प्रत्येकाची मानसिकता तशी तयार व्हायला हवी. हा प्रकार केवळ मुंबई शहरातच नव्हे, तर गाव खेड्यातही पाहायला मिळतो. साध्या कोणत्याही वादाचे उदाहरण घ्या पहिले लक्ष्य त्या कुटुंबातील महिला आणि मुलींना केले जाते. विशेषतः तळागाळातील समाजांच्या महिला या प्रकाराच्या मोठ्या प्रमाणात शिकार होताना दिसतात. भारत सरकारच्या राष्ट्रीय अपराध रेकॉर्ड ब्युरोचा अहवाल पाहिला तर अंगावर शहारे येतात. प्रतिदिवसाला सहा दलित महिलांवर बलात्कार होत असल्याचे नोंदलेल्या गुन्ह्यांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. अबू्र झाकण्यासाठी आणि जीवाच्या भीतीने दडपलेल्या केसेस लाखोंच्या संख्येत आहेत. मुद्दा सजा करण्याचा किंवा गुन्हा नोंदवण्याचा नाही, तर विकृत मानसिकता बदलण्याचा आहे.