पुणे :मुद्रण पेपर, शाई साहित्य यांच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ झाली असून कुशल कामगारांसाठी होणारा मोठ्या प्रमाणातील खर्च बरोबरीने मुद्रण क्षेत्राबाबत शासनाची उदासीन भूमिका या महत्वाच्या बाबीमुळे सध्याच्या मुद्रण क्षेत्र हे मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करत आहे. यामुळे मुद्रण व्यावसायिकांच्या दरांमध्ये किमान ३० टक्के दरवाढ असून १५ सप्टेंबरपासून लागू करण्यात येणार आहे, अशी माहिती दि पूना प्रेस ओनर्स असोसिएशन पुणेचे अध्यक्ष रवींद्र जोशी यांनी दिली.
यावेळी बोलताना रवींद्र जोशी म्हणाले की,जगामध्ये रोजगार निर्मितीमध्ये दुसऱ्या स्थानावर मुद्रण क्षेत्राला देखील इतर बाबींच्या दरवाढीचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. गेल्या दोन महिन्यात पेपरच्या किमतीमध्ये दर किलोमागे सुमारे १२ ते १५रुपयांपर्यंत वाढ झाली असून या वाढीमुळे सध्याच्या किमतीमध्ये प्रिंटींग करून देणे ही व्यावसायिकांसाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे .
उच्च दर्जाची यंत्रसामग्री ही परदेशातून मागवावी लागते. यंत्रसामग्री अतिशय महाग असून सरकारने मोठ्या प्रमाणात कर लादल्यामुळे त्याची किंमत देखील आवाक्याबाहेर जाते. आपसूकच अशा यंत्रसामुग्रीने दर्जा सुधारतो मात्र, त्याचे उत्पादनशुल्क देखील मोठ्या प्रमाणात वाढते.तर कुशल कामगारचे पुणे सचिव अतुल वाडकर म्हणाले की, मुद्रण व्यावसायिकांना भेडसावत असलेल्या समस्यांचा सामना करण्यासाठी ही केलेली दरवाढ गरजेची असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. सुमारे दीड वर्षापूर्वी १७ टक्के दरवाढ करण्यात आली होती.
दि पूना प्रेस ओनर्स असोसिएशन पुणेच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आली होती. यावेळी दि पूना प्रेस ओनर्स असोसिएशन पुणेचे उपाध्यक्ष कृष्णा उत्तेकर, कुशल कामगारचे पुणे सचिव अतुल वाडकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.