मुद्रांक शुल्क वाढीस सेनेचा विरोध

0

मुंबई । राज्य सरकारने शहरी भागातील स्थावर मालमत्तेच्या अभिहस्तांतरणासाठी (कन्व्हेन्स डीड) 5 टक्के तर ग्रामीण भागासाठी 4 टक्के आणि बक्षीस पत्रासाठी तीन टक्के मुद्रांक शुल्क आकारण्याचा निर्णय कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला आहे. मात्र सरकारच्या या निर्णयाला शिवसेनेने तीव्र विरोध दर्शवला आहे. मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय तातडीने मागे घ्यावा अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन छेडेल, असा इशारा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिला आहे. त्यामुळे मुद्रांक शुल्क वाढीच्या निर्णयावरून सेना-भाजप आमने सामने येण्याची शक्यता आहे.

बैठकीत शिवसेनेचे मंत्री दिवाकर रावते यांनी विरोध दर्शवला होता
मुद्रांक शुल्क वाढीच्या निर्णयाला कालच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. त्याला शिवसेनेचा विरोध दर्शवण्यासाठी कदम यांनी त्यांच्या दालनात पत्रकार परिषद बोलावली होती. सरकारच्या निर्णयाचा शिवसेना निषेध करत असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला असल्याचे कदम यांनी सांगितले. मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचे मंत्री दिवाकर रावते यांनी विरोध दर्शवला होता. मात्र शिवसेनेच्या विरोधानंतरही हा निर्णय घेण्यात आला आहे. बक्षीस पत्रात मुद्रांक शुल्क वाढवून रक्ताच्या नात्यात फूट पाडण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असल्याची जहरी टीका कदम यांनी केली. हा धोरणात्मक निर्णय आहे. त्यामुळे धोरणात्मक निर्णय घेताना शिवसेनेशी सल्ला मसलत करायला हवी होती, असेही कदम म्हणाले. आज मुख्यमंत्री नसल्याने गुरुवारी त्यांची भेट घेऊन हा निर्णय मागे घेण्याची मागणी करणार असल्याचे रामदास कदम यांनी सांगितले.

राम शिंदे बालिश, घोटाळ्याचे पुरावे देणार
रत्नागिरी येथील जलयुक्त शिवार योजनेच्या कामातील भ्रष्टाचार माझा मुलगा योगेश कदम याने बाहेर काढला आहे. मुलाने चांगले काम केले असून, शासनाच्या पैशांचा अपव्यय होतोय. तो शोधून काढला आहे. ते चांगले काम केले आहे. त्यामुळे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांची माफी मागण्याचा प्रश्‍न नाही. ते माझ्यापेक्षा ज्युनिअर असून बालिश आहेत असेही कदम म्हणाले. जलयुक्त शिवारच्या कामावर स्थानिक आमदाराची सही असते. त्याच्याशी पालकमंत्र्यांच्या संबंध नसतो. त्यामुळे राम शिंदे यांनी प्रथम अभ्यास करावा असा टोला कदम यांनी लगावला. पालकमंत्री रवींद्र वायकर आणि माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. राम शिंदे हे शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये भांडणे लावण्याची कामे करत असल्याचा आरोप त्यांनी केला. राम शिंदे खोटारडे आहेत. घोटाळा झाला नाही कसे बोलतात? रत्नागिरीच्या कामासंदर्भातील सर्व पुरावे, ठेकेदारामधील संभाषण याची व्हिडिओ क्लिप मीडियासमोर आणि मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात येईल. एका तालुक्यातील जलयुक्त शिवारच्या कामात 5 ते 10 कोटी घोटाळा झाला असेल तर राज्यातील कामात हजारो कोटी असू शकतात, अशी शक्यता कदम यांनी व्यक्त केली. तसेच सेनेच्या सर्व पदाधिकार्‍यांनी जलशिवारच्या कामाची स्वतः जाऊन पाहणी करावी यासाठी 19 मेच्या नाशिक येथील शिवसेनेच्या मेळाव्यात आवाहन करण्यात येणार आहे, असेही कदम यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, शेतकरी संकटात असताना कृषीमंत्र्यांनी परदेश दौरा करणे योग्य नाही. आम्ही शेतकरी कष्टकार्‍यांसाठी बसलो आहोत. अभ्यास केला पाहिजे, दौरा काढला पाहिजे पण ही वेळ नव्हती असा प्रहार कदम यांनी कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्यावर केला आहे.