भुसावळ । रावेर सद्य स्थितीत मुद्रा लोन योजनेतंर्गत अनेक वाद उद्भवत आहेत. त्यामुळे बँकेच्या व्यवस्थापकांनी यासंदर्भात आवश्यक असलेली कागदपत्र स्वत: तपासावे, संपुर्ण खात्री झाल्यानंतरच कर्ज मंजूर करण्यात यावे. यासाठी एजंट किंवा राजकीय लोकांचा वापर करु नये, मिळण्यासाठी कोणतीही व्यक्ती दबाव आणत असेल तर याबाबत पोलीसात लेखी स्वरुपात तक्रार द्यावी अशा सुचना डिवायएसपी निलोत्पल यांनी बँक व्यवस्थापकांना दिल्या.
खबरदारीच्या केल्या सूचना
बँक अधिकार्यांवर वारंवार होणारे हल्ले व धमक्या संदर्भात डिवायएसपी निलोत्पल यांच्या कार्यालयात शहरातील बँक व्यवस्थापकांची बैठक घेण्यात आली. यावेळी निलोत्पल यांनी खबरदारीच्या सुचना केल्या. याप्रसंगी बाजारपेठ पोलीस स्थानकाचे निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांची उपस्थिती होती.
सुरक्षा रक्षकांची संपुर्ण माहिती पोलीसात द्या
डिवायएसपी निलोत्पल यांनी बँक व्यवस्थापकांच्या समस्या जाणून घेत उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्या. बँकेत व एटीएम मशिन जवळ शस्त्रधारी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी, नेमण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव, पत्ता मोबाईल क्रमांक तसेच खाजगी कंपनीचा सुरक्षा रक्षक असल्यास कंपनीची माहिती पोलीसात नोंद करावी. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची सुचना केली.
पोलीसांना माहिती द्यावी
सुरक्षा अलार्म लावून ते सुस्थितीत आहे किंवा नाही याची खात्री करुन घ्यावी. संशयास्पद हालचाली करताना व्यक्ती आढळून आल्यास त्याची पोलीसांना लागलीच माहिती देण्यात यावी. बॅँकेच्या जीर्ण झालेल्या भिंती, कपाऊंड दुरुस्ती करण्यात यावी, सध्या मोबाईल वरुन एटीएमचे पीन नंबर मागण्याचे प्रकार वाढत आहे. पीन नंबर कोणत्याही बँकेकडून मागविण्यात येत नाही. ते देण्यात येऊ नये असे फलक दर्शनी भागात लावावे.