प्रकाश जावडेकर यांची माहिती; जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीच्या बैठकीत योजनांचा आढावा
पुणे : लघु उद्योजकांना कर्ज सहज उपलब्ध करून देण्यासाठी ‘मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अॅन्ड रिफायनान्स एजन्सी’ अर्थात ‘मुद्रा’ योजनेतून तीन जिल्ह्यांत सुमारे 6 लाख 60 हजार तरुणांना सुमारे सहा हजार कोटींचे कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. व्यावसायिकांना कर्ज फेडणे सोयिस्कर व्हावे, यासाठी डेली कलेक्शन बँकांनी कर्जदारांनी घेऊन ते बचत खात्यात जमा करावे आणि त्यातून महिन्याचा कर्जाचा हप्ता घ्यावा, अशा सूचना बँकांना दिल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण (दिशा) समितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
बँकेत मिळणार्या सुविधा पोस्ट ऑफिसमध्ये सुरू करण्यात आल्या आहेत. त्या सध्या शहरातील पोस्टात सुरू असून, 31 डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील 891 पोस्ट कार्यालयांमध्ये बँकिंग सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे ज्या गावांत बँक नाही, त्या गावांमध्ये पोस्टल बँक सेवेचा मोठा लाभ नागरिकांना होणार आहे.
भ्रष्टाचार्यांविरोधात कारवाई सुरू
काँग्रेस नेते आणि कर्जबुडवे यांची पोलखोल होत आहे. कर्जवाटपात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. ही प्रकरणे आता बाहेर येत आहेत. अशा लोकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कारवाई सुरू केली आहे, काँग्रेस सरकारने 2008 ते 2014 या काळात अपात्र लोकांना कर्जे वाटप केली आहेत. बँकांना काँग्रेसच्या मंत्र्यांनी कर्जे देण्यासाठी फोन केल्याने कर्जे दिली गेली आहेत. टेलिफोन बँकिंगद्वारे कर्जे वाटप करण्यात आली. कर्जाची परतफेड न झाल्याने एनपीएचे प्रमाण वाढत असून, हा एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे. मात्र, काँग्रेस सुडाचे राजकारण करून आरोप करत आहे.