मुबंई-पुणे एक्सप्रेसवे पुलावरून कांद्याचा ट्रक पलटला; दोघे गंभीर जखमी

0
50 फुट उंचीवरून पुलाखालच्या काही दुकानांजवळ ट्रक आदळला
परिसरातील नागरिकांची कांदे नेण्यासाठी मोठी झुंबड उडाली
लोणावळा : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरून मुंबईला कांदे घेऊन जाणारा ट्रक एक्सप्रेसवेच्या लोणावळा एक्झिट येथील दोन्ही पुलाच्या मधोमध पलटला. सुमारे 50 फुट उंचीवरून जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या पुलाखालच्या काही दुकानांजवळ ट्रक आदळला. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असून या घटनेत दोघे जण गंभीर जखमी झाले. तर, ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता वलवन येथील लोणावळा एक्झिट जवळ घडला. कांद्याच्या ट्रकच्या अपघाताची माहिती कळताच परिसरातील नागरिकांची कांदे नेण्यासाठी मोठी झुंबड उडाली होती.
नियंत्रण सुटल्यामुळे अपघात…
लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर येथून मुंबईला एक ट्रक ( क्रमांक- एमएच-13. एएक्स-8127) कांदे घेऊन जात होता. भरधाव वेगामुळे ट्रक चालकाचे लोणावळा एक्झिट येथील अंतर वळणावर नियंत्रण सुटले. ट्रकचा वेग जास्त असल्याने ट्रक सिमेंटच्या कठड्यावर जोरात आदळून सुमारे शंभर ते सव्वाशे मीटर घासत दोन्ही मार्गावरील पुलांच्या कठडयावरून खाली पडला. या घटनेत ट्रकचा अक्षरशः चुराडा झाला. सुदैवाने यादरम्यान कोणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली.
प्रवाशांनी केले गर्दी
अपघाताची खबर परिसरात पसरताच शेकडो नागरिकांची कांदे नेण्यासाठी घटनास्थळी झुंबड उडाली होती. प्रत्येकाने मिळेल तितके कांदे गोळा करून गोण्या व पिशव्यांतून रवाना केले. स्थानिकांचे हे दृश्य पाहून या मार्गाने ये जा करणार्‍या प्रवाशांनी देखील कांदे गोळा करण्याची संधी सोडली नाही. जवळ जवळ दोन तास कांदे गोळा करण्याचा सपाटा नागरिकांनी लावला होता. दरम्यान, अपघातानंतर स्थानिकांच्या मदतीने आयआरबीच्या देवदूत आपत्कालीन पथकाने जखमी ट्रक चालक आणि त्याच्या सहकार्याला उपचारासाठी पुण्याला रवाना करण्यात आले. अपघाताची माहिती समजताच लोणावळा शहर व खंडाळा महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहाणी करून अपघातग्रस्त ट्रकला क्रेनच्या सहाय्याने बाजूला केले. अपघातामुळे ट्रकमधील संपूर्ण कांदे घटनास्थळी व जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर विखुरला होता. जुन्या मार्गावर विखुरलेल्या कांद्यामुळे दोन्ही बाजूंकडील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.