मुरबाड : पेट्रोलपंपावर ग्राहकांची होणारी लुटमार थांबविण्यासाठी राज्यभरात गुन्हा अन्वेषण विभागाने सुरु केलेल्या धाडसत्रामुळे सर्व पेट्रोलपंप धारकामध्ये खळबळ माजली असतानाच मुरबाड शहरातील सोनारपाडा येथील पंपावर मशीनमध्ये हेराफेरी करुन ग्राहकांची लुटमार सुरुच आहे. त्यामुळे गुन्हा अन्वेषण विभागाने केलेली कारवाई संशयाच्या भोवर्यात सापडली आहे.
मुरबाड सोनारपाडा येथील आर.के. या पेट्रोल पंपावर सदाशिव पवार हे दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी गेले असता त्यांनी 210 रुपयांचे पेट्रोल भरण्यासाठी तेथील कर्मचार्याला मशीन सेट करुन पेट्रोल टाकण्यास सांगितले. परंतु 210 आकडा सेट केला असताना त्यांना 211 रुपयांचे पेट्रोल टाकल्याचे त्याचे निदर्शनास आले असता आपल्या गाडीत पेट्रोल कमी भरल्याचा संशय त्यांना आला. त्यांनी त्याच्याकडून रितसर 577117 या नंबरची पावती घेतली. आपली तक्रार नोंदविण्यासाठी पंप मालकाकडे तक्रार पुस्तकाची मागणी केली असता आम्हाला तक्रार पुस्तक मिळाले नाही. तुम्ही आमच्या डायरीमध्ये तक्रार नोंदवा असे सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली. हा गंभीर प्रकार त्यांनी तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकारी गौतम बबन खरात यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी संपर्क साधला असता ते म्हणाले की तुम्ही रितसर आमच्याकडे तक्रार द्या, त्याचा अहवाल वरिष्ठाकडे सादर केला जाईल.