मुरबाड । मुरबाड तालुक्यात 207 गावांमध्ये तसेच वाड्यापाड्यात कष्टकरी शेतकरी आहेत. काबाडकष्ट करून पिकविलेले धान्य शासन जरी हमी भावात खरेदी करीत असले तरीही यंदा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भात खरेदी केंद्रे सुरु न झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मुरबाड तालुक्यात एकूण क्षेत्रफळापैकी 20000 हेक्टरमध्ये भात शेती केली जात असून सदरचे पीक एकदाच घेतले जात आहे. तसेच मुरबाड तालुक्यातील झिनी पीक हे ठाणे जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. या भाताला सर्वत्र मागणी असते. मात्र यंदा झिनीच्या भात पिकांवर मोठ्या प्रमाणात रोग पडल्यामुळे शेतकर्यांचे नुकसान झाले असून शेतकरी चिंतेत आहे.
झिनी भाताचे नुकसान
मुरबाड तालुक्यात एकूण क्षेत्रफळापैकी 20000 हेक्टरमध्ये भात शेती केली जाते. यंदा झिनीच्या भात पिकावर अनेक रोग पडल्याने बहुतांश पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे तालुक्यात सर्वत्र झिनी भाताचे मोठे नुकसान झाले आहे. मुरबाड तालुक्यात ऐन कापणीच्या भरात पिके आली असताना परतीच्या पावसाने थैमान घालून भात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे उरले सुरले पीक शेतकर्यांने काढले आहे. त्याची झोडणी मळणी केली आहे. ते पीक साठवून ठेवण्याची वेळ शेतकर्यावर आली. आहे. हे साठविलेले पीकही उंदीर आणि घुशी फस्त करण्याची शक्यता आहे. तरी लवकरात लवकर भात खरेदी केंद्रे सुरु करण्याची मागणी मुरबाड तालुक्यातील शेतकर्यांनी केली आहे.