मुरबाड : मुरबाड तालुक्यात 1972 मध्ये खेडोपाडी आणि गावोगावी विद्युत पुरवठा जोडला गेला होता. त्यानंतर तालुक्यातील नागरिक विजेच्या अनेक समस्यांनी हैराण होते. म्हणूनच मुरबाड मॅन्युफॅक्चअर असोसिएशन सभागृह येथे शनिवारी सामूहिक वीज तक्रार निवारण शिबीर आयोजित करण्यात आले. या वेळी वीज ग्राहक तक्रार निवारण शिबिरात मुरबाड ग्रामीण व शहरी भागातून जवळपास 200 पेक्षा जास्त वीज ग्राहकांच्या तक्रारी आल्या आहेत. त्या वीज ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण लवकरात लवकर केले जाईल असे प्रतिपादन मुरबाड विधानसभा आमदार किसान कथोरे यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर कल्याण महावितरणचे मुख्य अभियंता रामराव मुंडे, कार्यकारी अभियंता नितीन पेवेकर, तसेच पेणकर व मुरबाड उप कार्यकारी अभियंता डी. एम. दवंगे, भाजप जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे, तालुका अध्यक्ष जयवंत सूर्यराव, टीडीसी बँकेचे माजी अध्यक्ष उल्हास बांगर, मुरबाड नगरपंचायतचे नगराध्यक्ष किसान कथोरे, उप नगराध्यक्ष नारायण गोंधळी यांच्यासह सर्व महावितरण कंपनीचे शाखा अभियंता व खेड्यापाड्यातून आलेले वीज ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोबाईलवर मेसेजद्वारे ग्राहकांना मिळणार माहिती
यावेळी मुख्य अभियंता रामराव मुंडे यांनी सांगितले की तालुक्याचे आमदार किसान कथोरे यांनी ज्या समस्या मांडल्या आहेत. तसेच वीज ग्राहकांकडून आलेल्या सर्व तक्रारींचे निवारण मी स्वतः जातीने लक्ष घालून मार्गी लावणार आहे. तसेच लवकरात लवकर नव्याने सुरु होणारे सरळगाव सबस्टेशनच्या उदघाटनाचा कार्यक्रम मंत्री महोदयांच्या उपस्थितीत होणार आहे. तसेच ज्या ज्या ग्राहकांनी तक्रारी केल्या आहेत. त्या त्या ग्राहकांनी आपला मोबाईल नंबर रजिस्टर करून घ्यावा कारण यानंतर वीज बिलासंदर्भात ज्या काही तक्रारी असतील. त्यांचे निवारणाविषयीची माहिती मोबाईलवर मेसेजद्वारे ग्राहकांना दिली जाणार आहे. असे संकेत त्यांनी या वेळी दिले.
तालुक्यात महावितरणचे सुमारे छत्तीस हजार ग्राहक आहेत. त्यांना पन्नास वर्षीपूर्वी टाकलेल्या पोल आणि तारामधून वीजपुरवठा केला जात असल्याने त्या तारा तुटून व पोल पडून वेळोवेळी विज पुरवठा खंडित होत असल्याने ग्राहकांमध्ये असंतोष पसरल्याचे भाजपा आमदार किसन कथोरे यांनी यावेळी सांगितले. तसेच महावितरणच्या अधिकार्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी वेगवेगळ्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. त्यामध्ये मुरबाड तालुक्यात टाकलेल्या तारा या वन विभागाचे जागेतून टाकण्यात आल्या असल्याने त्याठिकाणी पावसाळ्यात झाडांची छाटणी होत नसून जंगलात एखाद्यावेळी तार तुटल्यास ती कर्मचार्यांच्या निदर्शनास येत नाही. ते ठिकाण शोधण्यासाठी बराच वेळ लागतो. त्यामुळे तेवढा वेळ पुरवठा बंद राहतो. हे टाळण्यासाठी पावसाळ्या पुर्वीच ही कामे करणे आवश्यक आहे. तसेच मुरबाड तालुक्यासाठी स्वतंत्र सबस्टेशनची व अतिरिक्त कर्मचार्यांची गरज आहे. शिवाय ट्रान्सफॉर्मर जर नादुरुस्त झाला तर कल्याण, बदलापूर, किंवा अंबरनाथ या ठिकाणी न्यावा लागतो त्यामुळे त्यांची दुरुस्ती मुरबाड होणे गरजेचे असल्याचे कथोरे यांनी यावेळी सांगितले.
निधी देवूनही महावितरणची कामे अपूर्णच
गेल्या आठ वर्षात आमदार किसन कथोरे यांनी महावितरणच्या कारभारात तसेच वीजपुरवठ्यात बदल होण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. तरीही मुरबाड तालुक्यात आजही महावितरणने गेल्या पन्नास वर्षात टाकलेले पोल व तारा या सद्य परिस्थितीत अत्यंत जीर्ण झाल्या असून गंजल्या आहेत. ग्रामीण भागासह शहरी भागात वीज चोरीच्या प्रमाणात वाढ झाली असून वीज चोरीमुळे महावितरणला महसुलात मोठा तोटा सहन करावा लागतो. तो तोटा भरुन काढण्यासाठी सर्वसामान्य ग्राहकाला अव्वाच्या सव्वा विजेची बिले येत असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. ग्राहकांच्या या तक्रारीची दखल आमदार कथोरे यांनी घेत महावितरणला जाब विचारण्यासाठी व नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी महावितरण विरोधी तक्रार निवारण जनता दरबाराचे आयोजन केले होते.
विजग्राहकांच्या आलेल्या एकूण तक्रारी
धसई 34 तक्रारी
सरळगाव 21 तक्रारी
मुरबाड शहर 18 तक्रारी
मुरबाड ग्रामीण 60 तक्रारी
शिरोशी 29 तक्रारी