मुरबाड : मुरबाड शहरात सौ निर्मला बळीराम तोंडलीकार विद्यालय (ज्ञानदीप विद्यालय) या विद्यालयामध्ये मुख्याद्यापक सेवानिवृत्ती 31 डिसेंबर 2015 रोजी झाले होते. तदनंतर संस्थेने सौ साधना मच्छिन्द्र ठाकरे यांच्याकडे मुख्याध्यापक पदाचा कार्यभार सोपविला. परंतु अनिता सुभाष सोनावणे यांनी हरकत घेतल्याने प्रशासनाकडून मुख्याध्यापक पदासाठी आजतागायत मान्यता मिळाली नाही. त्यामुळे जवळपास 1.5 वर्ष सदरचे मुख्याध्यापक पद रिक्त असल्याने सर्व अध्यापन वर्ग बेमुदत आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.
प्रशासनाकडून सेवा ज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापक पदासाठी प्रस्ताव सादर करण्यासंदर्भात सूचित करूनही या बाबत प्रशासनाकडून योग्य कार्यवाही न झाल्याने सदर विद्यालयाचे मुख्याध्यापक पदाची निवड प्रलंबित आहे. सदरचे पद रिक्त असल्याने जानेवारी 2017 पासून सर्व अध्यापक पगारापासून वंचित आहे. परिणामी त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच त्यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक बाबींच्या अनुषंगाने आलेल्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पैशाअभावी शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे वरील सर्व कारणास्तव पद त्वरित भरले नाही तर सर्व अध्यापक वर्ग 8 ऑगस्टपासून बेमुदत अध्यापन बंद आंदोलन करणार असल्याचा लेखी इशारा अध्यक्ष व सर्व संस्था चालक तसेच शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य, मुख्य कार्यकारी अधिकारी ठाणे, प्राथमिक शिक्षण अधिकारी, ठाणे यांना दिला आहे.