मुरबाडमध्ये तिसर्‍या टप्प्यातील निवडणूक, पोटनिवडणुकांची घोषणा

0

मुरबाड । जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा धुरळा खाली बसतो न बसतो तोच मुरबाडमध्ये पुन्हा एकदा तिसर्‍या टप्प्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व काही ग्रामपंचायतींचा पोटनिवडणुकीच्या कार्यक्रम जाहीर झाल्याने सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला जोरदार सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. मुरबाड तालुक्यातील चिखले, वांजळे, संगम, कुडवली, नंधइ, जडई, सोनगाव, मढ, रामपूर, पेंढरी, सोनावळे, न्हावे, देवगाव, फांगळोशी, कोरावळे, कळंभे, म्हाडस, माजगाव या ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुक होणार आहे. त्याच बरोबर उमरोली खुर्द, टोकावडे, ओजिवाले, दहिगाव शेलारी, आस्कोत, मेर्दी, खेडले, वाल्हीवरे, आंबले खुर्द, मोहघर, तळावली बा, शिदगाव, वडवली, उमरोली बु, सायले, कासगाव, न्याहाडी, झाडघर, महाज या ग्रामपंचायतींच्या काही रिक्त जागांसाठी पोटनिवडणुका होणार आहेत.

यादोन्ही निवडणूक 25 फेब्रुवारी रोजी होणार असून मतमोजणी 26 फेब्रुवारीला होईल, अशी माहिती नायब तहसीलदार हनुमंत जगताप यांनी दिली आहे. तिसर्‍या टप्प्याच्या 18 ग्रामपंचायतींचे व 19 ग्रामपंचायत पोटनिवडणुकीच्या बिगुल वाजल्याने पुन्हा एकदा मुरबाड तालुक्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. या निवडणुकीतून थेट सरपंच निवडला जाणार असल्याने गाव पातळीवर ठिकठिकाणी बैठक सुरु झाल्या आहेत. तर काही ग्रामपंचायतींमध्ये उमेदवार चाचपणी सुरु झाली आहे. तर तालुक्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादी व शिवसेना यांची युती असणार तर भाजप स्वबळावर हि निवडणूक लढवणार असल्याने पुन्हा तालुक्यात राजकीय वातावरण ठवळून निघणार आहे.