मुरबाड : मुरबाड तालुक्यात जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेसोबत यापुढे राष्ट्रवादी राहणार असल्याची माहिती माजी आमदार गोटीराम पवार यांनी दिली. शिवले येथे आयोजित केलेल्या नवनिर्वाचित बाजार समितीच्या संचालकांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात त्यांनी वरील माहिती दिली.
यावेळी व्यासपीठावर माजी आमदार गोटीराम पवार, शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख प्रकाश पाटील, ठाणे जिल्हा राष्ट्रवादी अध्यक्ष दशरथ तिवरे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष रामभाऊ दळवी, शहापूर तालुका मारुती धिरडे, मुरबाड तालुका प्रमुख कांतीलाल कंटे, सरळगाव विभाग प्रमुख पांडुरंग धुमाळ, मुरबाड शहर प्रमुख राम दुधाळे, खरेदी विक्री संघाचे संचालक प्रकाश पवार यांच्यासह सर्व बाजार समितीचे माजी सभापती व उपसभापती, खरेदी विक्री संघाचे चेअरमन तसेच राष्ट्रवादी-शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी गोटीराम पवार म्हणाले की, तालुक्यात चाललेली गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. तसेच 4 ते 5 महिन्यांनी होणार्या जिल्हा परिषद निवडणुकीत व पंचायत समितीच्या निवडणुकीत तालुक्यात लवकरच राजकीय समीकरणात बदल होणार आहे. माजी सभापती व ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक सुभाष पवार हे लवकरच शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा आहे.