मुरबाड । तालुक्यातील अनेक गावांमध्ये बॉटुलिझम या विचित्र आजाराची शेकडो जनावरांना लागण झालेली असून यातील अनेक शेतक-यांच्या गाई-म्हशी दगावल्याची घटना घडली आहे. या भागातील गावोगावी जाऊन सर्व जनावरांची तपासणी करण्याची मागणी माजी उपसभापती भगवान महादेव भला यांनी जिल्हा पशुधन विभागाकडे केली आहे. ठाणे जिल्हा पशू अधिकारी प्रशांत कांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन लागण झालेल्या जनावरांची पाहणी केली. त्यांच्या सोबत मुरबाड तालुका पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश चंदनशिवे, टोकावडे पशू वैद्यकीय अधिकारी व अन्य अधिकारी सोबत होते. तालुक्यातील तळेगाव परिसरातील खुटल बारागाव, दिघेफळ, फांगलोशी इत्यादी गावामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून गाई, म्हशी व बैल यांना विचित्र आजाराची लागण झाली आहे. या आजाराने दिघेफळ गावात तुळा राघो खोडका यांच्या तीन गाई एक बैल, कुशा धाऊ पोकळा यांच्या दोन गाई एक बैल व एक आजारी, धाऊ राघो खोडका यांची एक गाय एक बैल एक आजारी, भास्कर भिकाजी पारधी यांची एक गाय, धाऊ मालू केव्हारी यांच्या तीन गाई दोन आजारी, गोपाळ हरी मोंडूळा यांची एक गाय, मंगल मैदू भला यांच्या दोन गाई एक बैल व दोन जनावरांना लागण झाली आहे. शेजारील इतर गावातदेखील या गंभीर आजाराने अनेक शेतकर्यांची गुरे दगावल्याची माहिती भगवान भला यांनी यावेळी दिली . याबाबत त्यांनी तालुका पशुधन अधिकारी यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांनी यासंदर्भात काहीच उपाय योजना केली नाही. त्यामुळे जिल्हा पशुधन अधिकारी यांचेकडे यासंदर्भात तक्रार नोंदवून या विभागातील सर्व शेतकर्यांच्या गुरांची तपासणी करून लसीकरण करण्याची मागणी केली आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी देखील मुरबाड आणि शहापूर तालुक्यात या विचित्र आजाराने बाधित पशुधनाची तत्काळ पाहणी करून हा आजार नियंत्रणात आणण्याच्या सूचना जिल्हा पशुधन अधिकार्यांना दिलेल्या आहेत.
आजाराची लागण झाल्याची लक्षणे
गुरांचे पायबळ जाते, ताकद कमी होते, शेपटी लुळी पडते, चालता-उठता येत नाही, थोडी लाळ पडते, भूक मंदावते, अंग गार पडते, शेपटीला व पायाला सुई तोचल्यास वेदना होत नाही, चार गिळू शकत नाही, शेण सुक्या लेंड्या व आव या स्वरूपात असते.
आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना
या आजारावर रामबाण उपाय नाही. जनावरांना रानात व उन्हात मोकाट सोडू नये. दररोज खुराक व 50 गरम क्षार मिश्रण खाऊ घाला. मृत पावलेली जनावरे खोल खड्ड्यात पुरवत. कुजलेली हाडे जाळून टाकावीत. चार सुकवा व खाऊ घाला असे टोकावडेमधील पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. व्ही. भालेराव यांनी सांगितले.