मुरबाड मध्ये विनापरवाना मद्य विक्री करणाऱ्या दुकानदारावर गुन्हे दाखल होणार !

0

मुरबाड | मुरबाड तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील किराणा दुकाने, पानाची टपरी व भाजीपाला दुकाने आदी ठिकाणी विना परवाना मद्य साठा व विक्री करणारे आढळल्यास किंवा सापडल्यास त्या दुकानदारावर तात्काळ कारवाई करून गुन्हा दाखल करून त्यांचे दुकान सील केले जाईल, असा इशारा मुरबाड पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र मोरे यांनी मुरबाड पोलीस ठाण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिला.

यावेळी मुरबाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वसावे, स.पो.नि. तांबे, पोलीस उपनिरीक्षक बजरंग राजपूत, यांच्यासह अनेक पोलीस कर्मचारी उपस्थित होते. विशेषतः ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाड तालुक्यात १०० % गावठी दारू बंद करण्यासाठी पोलीस खात्याकडून मोठ्या प्रमाणात मोहीम राबवली जात आहे. व पोलिसांच्या सतत पडणाऱ्या धाडीमुळे चांगलाच धसका गावठी दारू साठा व विक्री करणाऱ्यांनी घेतल्याचे चित्र आज मुरबाडमध्ये पाहायला मिळत आहे. तालुक्यातील काही किराणा दुकानात, पान टपरीवर व भाजीपाला दुकाने तसेच काही गावांच्या घरात चोरी चुपके मद्याच्या छोट्या बाटल्या (क्वार्टर) विकल्या जातात अशी चर्चा गावागावात व नाक्या नाक्यावर होत असल्याने या संदर्भात राजेंद्र मोरे यांनी इशारा दिला व तालुक्यात अशा प्रकारची विक्री होत असल्यास नागरिकांनी तात्काळ पोलीस ठाण्याला फोन द्वारे खबर द्यावी. तुमच्या नावाचा कोणताही उल्लेख केला जाणार नाही याची आम्ही योग्य दक्षता घेऊ, असेही आवाहन राजेंद्र मोरे यांनी केले आहे.