मुरबाड (बाळासाहेब भालेराव) । मुरबाड तालुक्यात माजी महसूलमंत्री स्वर्गवासी शांतारामभाऊ घोलप यांच्या राजकीय कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता परंतु तालुक्यात अनेक शिवप्रेमींची आणि नागरिकांची हा पुतळा बदलण्यात यावा ही मागणी होती याच धर्तीवर शुक्रवारी भाजपा आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते मुरबाड शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्ण आकृती भव्य अश्वारूढ पुतळ्याचे भूमीपूजन करण्यात आले. त्यावेळी स्थानिकांनी गर्दी केली होती.
यावेळी कार्यक्रमात मुरबाड न्यायाधीश व्ही.एम.रेडकर, माजी आमदार दिगंबर विशे, मुरबाड पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र मोरे, मुरबाड पोलीस निरीक्षक अजय वसावे, भाजप ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दशरथ चोरघे, नगर पंचायतचे नगराध्यक्ष किसन (युवराज) कथोरे, उपनगराध्यक्ष नारायण गोंधळी, बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे, ठाणे सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष उल्हास बांगर, राजेश पाटील, गणेश कथोरे, ठाणे मजूर फेडरेशनचे अध्यक्ष सुहास मोरे, भाजप तालुका अध्यक्ष जयवंत सूर्यराव, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष रामभाऊ दळवी, मुरबाड तालुका रिपाई अध्यक्ष दिनेश उघडे यांच्यासह मुरबाड तालक्यातील व शहरातील शिवप्रेमी तसेच नगर पंचायतीचे सर्व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निधी कमी पडू देणार नसल्याची कथोरेंची ग्वाही
भूमीपूजनप्रसंगी आमदार किसन कथोरे म्हणाले की शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पूर्ण आकृती अश्वारूढ पुतळ्याचे भूमिपूजन करण्यात आले आहे. त्याच बरोबर मुरबाड शहराचा झपाट्याने मॉडेल विकास होत आहे, त्याच बरोबर येत्या सात ते आठ महिन्यात मुरबाड तालुका डांबरमुक्त होणार असून त्याबरोबर मुरबाड शहरी व ग्रामीण भागात सिमेंटचे रस्ते होणार आहेत. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पूर्ण आकृती पुतळ्याचे भूमीपूजन करण्यात येणार आहे. या सर्व बाबीसह विकास झपाट्याने होत आहे. त्यामुळे मुरबाड नगर पंचायतीमार्फत चांगले विकासाचे काम होत आहे. त्यामुळे मुरबाड तालुक्यात सुसज्ज प्रशासन इमारतीचे कार्यालय झाले आहे. राहिलेल्या इमारतींचे काम लवकरात लवकर केले जाईल व त्यासाठी लागणार निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली.