नवी दिल्ली । जुलै महिन्याच्या अखेरीस सुरू होणार्या श्रीलंकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वेस्टइंडिजच्या दौर्यात चमकदार कामगिरी करणार्या शिखर धवनचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. जखमी झालेल्या मुरली विजयच्या जागी धवनची संघात निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयने अधिकृत ट्विटर हँडलवर ही माहिती दिली आहे.
मायदेशात झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान मुरलीच्या मनगटाला दुखापत झाली होती. या दुखापतीतून मुरली अद्याप सावरलेला नाही. त्यामुळे बीसीसीआयच्या वैद्यकिय पथकाने त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 19 जुलै रोजी कोलंबोत दाखल होणार आहे. त्यानंतर 21 आणि 22 जुलैला भारतीय संघ सराव सामना खेळणार आहे. तिन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी 26 ते 30 जुलै दरम्यान कँडी येथे खेळणार आहे. दुसरा कसोटी गॉल येथे 4 ते 8 ऑगस्ट दरम्यान तर कसोटी मालिकेतील शेवटचा सामना कोलंबोतील एमसीए येथे 12 ऑगस्टपासून खेळला जाईल. कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ 24 आगस्ट ते 3 सप्टेंबरदरम्यान एकदिवसीय क्रिकेटची मालिका खेळेल.