हैदराबाद : बांगलादेशचे फलंदाजी प्रशिक्षक तिलन समरवीरा यांनी श्रीलंकेचा दिग्गज मुरलीधरन प्रतिभावान आणि भारतीय गोलंदाज आश्विन स्मार्ट क्रिकेटपटू आहे, असे मत व्यक्त केले. मुरलीधरनने कसोटी क्रिकेटमध्ये ८०० बळी घेतले तर आश्विनने सर्वांत कमी लढतींमध्ये २५० बळींचा पल्ला गाठला.
समरवीरा म्हणाले, ‘‘ते दोन्ही भिन्न गोलंदाज आहेत. मुरली प्रतिभावान क्रिकेटपटू होता, तर आश्विन अतिशय हुशार खेळाडू आहे. आश्विनने आपले कौशल्य विकसित केले आहे. त्याच्याकडे विविधता असून तो आपली दिशा व टप्पा बदलू शकतो. या दोघांची तुलना मात्र करता येणार नाही.’’ श्रीलंकेचा मधल्या फळीतील माजी फलंदाज असलेले समरवीरा म्हणाले, ‘‘वारसा हक्कावर माझा विश्वास आहे. सुनील गावस्कर यांनी नोंदवलेल्या विक्रमांचा सचिनने पाठलाग केला. आता सचिनने नोंदवलेल्या विक्रमांचा विराट पाठलाग करीत आहे. आश्विनसाठी अनिल कुंबळे व हरभजन सिंग यांनी मानदंड स्थापन केलेले आहेत. आता तो त्यांचा पाठलाग करीत आहे.