मुरुड : रायगड जिल्ह्यातील मुरुड येथे अलिबाग मुख्यालयात मुख्यालयात पोलिस हवालदार म्हणून कार्यरत असणार्या मंगेश यशवंत सावंत (रा.कोळीवाडा, अलिबाग) याच्याकडून 24 हजार 500 रुपये किंमतीची गावठी दारुसहित चारचाकी गाडी जप्त करण्यात आली आहे. अलिबाग येथील पोलीस मुख्यालयात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत असणारा मंगेश सावंत हा त्याची पत्नी नंदा मंगेश सावंत हिच्यासाहित त्याच्या ताब्यातील चारचाकी गाडीतून बेकायदेशीर रित्या गावठी दारूची वाहतूक करीत मुरुड येथे येत असल्याची माहिती मुरुड पोलीस ठाण्याचे प्रभारी किशोर साले यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी मुरुड येथील परेश नाका येथे सापळा रचला.
मंगळवारी पहाटे ही गाडी मुरुड येथील परेश नाक्यावर आली. त्या गाडीची तपासणी केली असता त्या गाडीमध्ये रु.24,500/-किमतीची हात भट्टीची तयार गावठी दारू मिळून आली. याबाबत मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास मुरुड पोलीस ठाण्याचे प्रभारी किशोर साले हे करीत आहेत.