मुरुड समुद्रकिनारी पर्यटकांची तुफान गर्दी

0

नांदगाव । सलग तीन दिवसाच्या सुट्ट्या आल्याने पर्यटकांनी मुरुड जंजिरा व काशीद समुद्रकिनारी गर्दी केली आहे. मुरुड येथील जंजिरा किल्ला पाहण्यासाठी आज सकाळपासूनच राजपुरी जेट्टी, खोरा बंदर, आगरदांडा जेट्टी तसेच दिघी येथून सुद्धा हजाराच्या संख्येने तुफान गर्दी किल्ला पाहण्यासाठी केली होती. ज्या ठिकाणी गाड्या पार्क करण्याची व्यवस्था आहे अशा ठिकाणी तर रस्त्याच्या दोन्ही बाजूस गाड्या पार्क करून गाड्यांची बहुसंख्य गर्दी दिसून येत होती. मुरुड शहरातील सर्व लॉजेस सलग तीन दिवसाच्या सुटीमुळे हाऊसफुल होती. तर प्रत्येक हॉटेलमध्ये भोजनासाठी मोठ्या रांगा पाहावयास मिळाल्या.

शनिवार, रविवार व सोमवारी नाताळची सुट्टी असल्याने प्रचंड प्रमाणात गर्दी दिसून आली. काशीद येथे सुद्धा मोठी गर्दी पहावयास मिळाली आहे. काशीद येथील सर्व हॉटेल व लॉजिंग हाऊसफुल होती. सलग सुट्ट्यांची बुकिंग पर्यटकांनी महिनाभर अगोदरच करून ठेवल्याने नवीन येणार्‍या पर्यटकांना येथे राहण्याची व्यवस्था झाली नाही. काशीद समुद्र किनार्‍यांच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहनांची गर्दी होती. पर्यटक मोठ्या प्रमाणात आले कि, प्रत्येकाची राहण्याची सोय करणे खूप कठीण बनले आहे. काशीद येथील सर्व लॉजेस हाऊस फुल असून काहींना इतर ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावयास लागली आहे.