मुरूम उचलण्यास सांगितल्याने मारहाण

0
दिघी : रस्त्यावर टाकलेला मुरूम उचलण्यास सांगितले म्हणून नवरा बायकोने मिळून एकाला रस्त्यात अडवून शिवीगाळ केली. तसेच नवर्‍याने मुरूम उचलण्यास सांगणार्‍या इसमाच्या दोन बरगड्या फ्रॅक्चर केल्या. हा प्रकार रविवारी दुपारी ताजणे मळा येथे घडली. रुग्णालयात उपचारादरम्यान बुधवारी (दि. 5) गुन्हा दाखल करण्यात आला.
भिकाजी जिवबा टिपुगडे (वय 38, रा. सिद्धिविनायक नगर, ताजणे मळा) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार भीमराव हृषीकेश बारकूल (रा. ताजणे मळा) आणि त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भीमराव यांनी त्यांच्या घरासमोर रस्त्यावर मुरूम टाकला होता. मुरुमाचा ढीग असल्यामुळे रस्त्याने जाण्यासाठी अडथळा येत होता. त्यामुळे भिकाजी यांनी ते राहत असलेल्या जमिनीचे प्लॉटिंग करणार्‍या लोकांना रस्त्यावरील मुरूम उचलण्याबाबत सांगण्याचे ठरवले. प्लॉटिंग करणार्‍या व्यक्तीच्या कार्यालयात जाऊन ही बाब सांगून दुचाकीवरून येत असताना भीमराव आणि त्यांच्या पत्नीने भिकाजी यांना अडविले. दोघांनी मिळून भिकाजी यांना शिवीगाळ केली. त्यानंतर भीमराव याने भिकाजी यांचा गळा दाबून त्यांना खाली पाडले व त्यांच्या छातीवर जोरजोराने मारले. यामध्ये भिकाजी यांच्या उजव्या छातीमधील दोन बरगड्या फ्रॅक्चर झाल्या. यावरून दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार ए. बी. देशमुख तपास करीत आहेत.