मुरूम टाकून वरुळ रस्त्याची तात्पुरती डागडुजी, वरुड रस्ता नव्याने होण्याची नागरिकांना प्रतीक्षाच
सामाजिक कार्यकर्ते सुयोग भदाणे यांच्या प्रयत्नाने रस्त्याची दुरुस्ती.
शिंदखेडा (प्रतिनिधी)सिंदखेडा शहरातील वरुळ रस्त्याची दुरावस्था झाली असून हा रस्ता नवीन तयार करण्यात यावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांची गेल्या अनेक वर्षापासून आहे. परंतु नेहमीप्रमाणे पंचायत समितीच्या संबंधित विभागाकडून या रस्त्यावर मुरूम टाकून खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात येते. सामाजिक कार्यकर्ते सुयोग भदाणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गटविकास अधिकारी प्रदीप पवार यांच्याकडे या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली होती.त्यानुसार रस्ता पूर्णपणे नवीन न होता खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले गेले. पंचायत समितीच्या संबंधित विभागाने या परिसरातील नागरिकांची दुधाची तहान ताकावर भागवल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. अखेर रस्ता कधी दुरुस्त होतो याची प्रतिक्षा या नागरिकांना आहेच.
शिंदखेडा शहरामध्ये अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झालीच आहे. त्यातल्या त्यात वरुळ रस्त्याची तर अधिकच दूर्दशा झाली आहे. या रस्त्यावर वाहन चालवणे तर सोडाच पायी चालणे देखील अवघड झाले होते.रस्त्यात खडडे की खडडयात रस्ता अशी अवस्था या रस्त्याची झाली आहे.रस्त्यावर पंचायत समिती, दोन शाळा, तीन दवाखाने तसेच दोन बँक व ४००० लोकसंख्येची वस्ती या रस्त्याला जोडलेली असुन हा रस्ता पुढे सहा खेडयांना जोडणारा आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठया प्रमाणात वाहनांची व नागरीकांची वर्दळ सुरू असते. त्यामुळे रस्त्यावरील खडडे टाळतांना मोठया प्रमाणात कसरत करावी लागत आहे. त्यात खडडे टाळण्याचा ओघात एखादया व्यक्तीचा जीव जाण्याची वेळ येण्याची शक्यता होती. सदर रस्ता हा नगर पंचायतीच्या हददीतुन जात असल्याने नगर पंचायतीने सुध्दा या रस्त्याची जबाबदारी घेतली पाहिजे अशी ही मागणी या परिसरातील नागरिकांनी केली होती.
अखेर गटविकास अधिकारी प्रदीप पवार यांनी या रस्त्याची पाहणी केली व तात्काळ संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात का असेना या रस्त्याची दुरुस्ती करण्याची आदेश दिले त्यानुसार वरुळ रस्त्यावर असलेले खड्डे मुरूम टाकून बुजवण्याचे काम सुरू झाले आहे. यापूर्वीही या रस्त्यावर मुरूम टाकून खड्डे बुजवण्याचे काम झाले होते. मात्र पावसामुळे ती मुरुमच वाहून गेली व पुन्हा खड्डे नागरिकांच्या नशिबी आले. तसे आता होऊ नये अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. सुयोग भदाणे,दर्पण पवार, प्रवीण पाटील, भूपेंद्र भदाणे, यांनी रस्ता दुरुस्तीसाठी पाठपुरावा केला.