शहादा (जिजाबराव पाटिल)। गणेश उत्सवाचे दिवस महिन्यावर येवून ठेपल्याने शहादा शहरातील गणेश मंडळांमध्ये नियोजन बैठका तर मुर्ती कारागिरांमध्ये गणेश मूर्ती तयार करण्याची तयारी जोरात सुरू आहे. माञ गेल्या अनेक वर्षांपासून मुर्ती तयार करण्याच्या कारखान्याच्या जागेचा प्रश्न प्रलंबित आहे. दरवर्षी तात्पुरत्या स्वरूपात पञ्याचे शेड उभारून काम भागविले जात आहे. एकाच ठिकाणी व सर्व सोयीसुविधांनीयुक्त जागा मिळाल्यास येथिल मुर्ती उद्योगाला एक एक नवी बाजारपेठ मिळणार आहे. येत्या 25 ऑगस्टपासुन गणेशोत्सवास प्रारंभ होत आहे.शहरात दहा ते बारा गणेश मुर्तीकार आहेत. दोन फुटापासून विस फुटापर्यंत आकर्षण गणपती मूर्ती बनविण्याचा येथिल मुर्तीकारांचा हातखंडा आहे.
कारखान्याच्या स्वतंत्र जागेचा प्रश्न
एखाद्या पडीक जागेवर किंवा रस्ताच्या कडेला कुठेतरी पत्र्याचे शेड तात्पुरत्या स्वरूपात उभारून गणेश मुर्ती बनविण्यात येतात. गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील गणेशमुर्ती कारखान्याच्या स्वतंत्र जागेचा प्रश्न प्रलंबित आहे. एप्रिल महिन्यापासून गणपती मूर्ती बनविण्याचे काम सूरू होत असे. मात्र आता पावसाळा सुरू झाल्याने गणेशोत्सवापर्यंत मूर्तीचे पावसापासून संरक्षण करण्याची लगबग सुरू आहे.यंदाही प्ररप्रांतीय मूर्तीकारांचे अतिक्रमण स्थानिक मूर्तीकारांना सहन करावे लागण्याची शक्यता व राजस्थानातील मुर्तीविक्रेते दाखल होत आहेत. त्याच्याकडील मूर्तीच्या किंमती स्थानिक कारागिरांच्या मूर्तीपेक्षा कमी राहत असल्यामुळे ग्राहकांचा त्याकडे साहजिकच कल असतो. मात्र फिनिशिंग, घडण व इतर बाबतीत मात्र स्थानिक मूर्तीकारांकडील मूर्ती उजव्या ठरतात. मात्र किंमती मुळे त्यांना उठाव नसतो. परिणामी चांगली मेहनत घेऊनही स्थानिक कारागिरांना न्याय मिळत नसल्याची स्थिती आहे. परप्रांतीय मूर्तीकारांना गावाबाहेर जागा द्यावी अशी मागणी स्थानिक कारागिरांनी केली आहे. माञ पालिका किंवा जिल्हा प्रशासनही त्याकडे लक्ष देत नाही.
इतर शहरांमध्ये पोहचली कला
शहरातील मूर्तीकारांकडून जळगाव, मालेगाव, धुळे येथिल मूर्तीकार कच्चे साचे ट्रक भरून घेऊन जात असतात. त्याठिकाणी या साच्यातून प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या साहाय्याने गणेशमूर्ती साकारण्यात येणार आहे.शहरात सध्या कुंभार गल्ली,शिवाजी रोड, मच्छीबाजार, सोनारगल्ली परिसरात गणेश मुर्ती निर्मितीचे कारखाने आहेत. दरवर्षी जागेचा प्रश्न निर्माण होतो. तो यंदाही कायम आहे. हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यात यावा व या व्यवसायाला आणि शहाद्याची वेगळी ओळख ठरलेल्या या मूर्ती कलेला वेगळे व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे अशी अपेक्षा मूर्ती कारागिरांसह कला प्रेमीकडूनदेखील व्यक्त करण्यात येत आहे. साच्यांपासून मुर्ती बनवणे ही कला परंपरागत शाळू मातीच्या मुर्तीपेक्षा वेगळी कला असून सध्या या मुर्तीची बाजारपेठेत मोठ्या स्वरूपात मागणी आहे. त्यामुळे या व्यवसायाला स्थानिकांची मदत मिळावी ही अपेक्षा आहे.
5 ते 12 फूट उंचीच्या मूर्ती
शहाद्याच्या गणेशमूर्तीला नजीकच्या गुजरात राज्यातील सुरत, बारडोली, मध्यप्रदेश राज्यातील खेतिया, खरगोन, बडवानीपर्यंत तसेच नंदुरबार, धुळे, शिरपूर येथे मागणी आहे. स्थानिक मुर्तीकांराना जागेबाबतदेखील अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. रहिवासी भागातच मोकळ्या जागेत कारखाना सुरू आहेत. पावसाचे दिवस सुरू आहे. त्यामुळे अनेक अडचणींना मुर्तीकांराना सामोरे जावे लागत असते. एका मूर्तीकाराकडे 5 ते 12 फूट उंचीच्या कमीत कमी 40 ते जास्तीतजास्त 100 मूर्ती विक्रीसाठी असतात. परिणामी मूर्ती ठेवण्यासाठी मोठी अडचण निर्माण होते. त्यामुळे रहदारीच्या रस्त्यावर मूर्ती ठेवाव्या लागतात. त्यामुळे तोडफोडची भीती असते. परिणामी शहराजवळच सर्व मूर्तीकांराना नाममात्र भाड्यात गणेशोत्सवाच्या तीन महिने आधीपासून जागा उपलब्ध करून द्यावी. गणेशपेठ तयार करावी.अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. मात्र दखल घेतली जात नसल्याची भावना मूर्तीकारांची आहे.
दरवर्षी गणेश मुर्ती बनविणारा शहाद्याचा मूर्तीकार नेहमी दुर्लक्षित राहिला आहे. शासनाने आम्हा मूर्तीकारांना जागा उपलब्ध करून द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करत आहोत त्याचबरोबर उद्योगाला चालना देण्यासाठी बॅकेकडून कर्ज उपलब्ध करून द्यावे.
रमेश पाटील ,मूर्तीकार शहादा