मुलगा मार खात असल्याचे पाहून बापाचा मृत्यू

0

पुणे :- मुलाला पोलीस डोळ्यासमोर पट्ट्याने मारहाण करीत असल्याच सहन न झाल्याने वडिलांचा हार्टअटॅकने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मोरेश्वर काळूराम मेंगडे (वय 61, रा.गोपाळ कृष्ण मंदिराजवळ गोखले नगर) असे मृत इसमाचे नाव आहे. अमोल मोरेश्वर मेंगडे (वय-34) यांनी वडिलांच्या मृत्युला पोलिसांना जबाबदार धरले. पोलिसांनी डोळ्यादेखत मारहाण केली आणि शिवीगाळ केल्याचा धक्का बसल्यामुळेच वडिलांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. हि घटना पोलीस ठाण्याअंतर्गत येणा-या जनवाडी पोलीस चौकीत रविवारी रात्री घडली.

अमोल मेंगडे आणि संदीप शुक्ला या व्यक्तीचा गाडी अंगावर घालण्यावरून वाद झाला होता. त्यानंतर झालेल्या वादात शुक्ला यांच्या डोळ्याला मार लागला होता. शुक्ला याने दुस-या दिवशी याची तक्रार जनवाडी पोलीस चौकीत दिली होती. पोलिसांनी अमोल याला रविवारी रात्री पोलीस चौकीत बोलावले होते. पोलिसांनी बोलावल्यामुळे वडील मोरेश्वर हे ही त्याच्या पाठोपाठ गेले असता पोलीस अमोलच्या पायावर पट्ट्याने मारहाण करत होते. यावेळी मारहाण करू नये म्हणून मोरेश्वर हे मुलाजवळ गेले असता पोलिस त्यांच्या अंगावर ओरडले आणि शिव्या देऊन त्यांना हाकलून लावले. हा धक्का सहन न झाल्याने ते चौकीतच चक्कर येऊन पडले आणि त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप अमोल याने केला आहे.