मुलगा-मुलगी असा भेदभाव करू नका : पठाडे

0

काळेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह

निगडी : आज पुरुषांच्या बरोबरीने महिला सर्वच क्षेत्रात काम करू लागल्या आहेत. महिलांनी उच्च स्थान गाठले आहे, अशा परिस्थितीत आजही घराण्याचा वंशज म्हणून मुलाकडे पाहिले जाते. ही बाब चिंतनीय आहे. समाजातील मुलींची संख्या घटण्याचे कारण ठरत आहे. मुला-मुलींचे प्रमाण समान असणे आवश्यक आहे. यातूनच समृद्ध आणि सुसंस्कृत समाजाची निर्मिती होणार आहे. यासाठी मुलगा-मुलगी असा भेदभाव करू नका, असे मत युवा कीर्तनकार ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज पठाडे यांनी व्यक्त केले. अधिक महिन्यानिमित्त काळेवाडी येथे विठ्ठलराज भजनी मंडळातर्फे अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये संत नामदेव महाराज यांचा ‘हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास’ या अभंगाचे निरुपण त्यांनी या वेळी केले.

तापकीर दाम्पत्याचा विशेष सत्कार
सप्ताहाचे मुख्य आयोजक महापालिकेच्या ‘ड’ प्रभाग कार्यालयाचे माजी स्वीकृत सदस्य नवनाथ नढे पाटील, नगरसेवक शत्रुघ्न काटे, कैलास बारणे, विनोद नढे, चंद्रकांत नखाते, उषा काळे, सुरेश भोईर, स्वीकृत सदस्य गोपाळ माळेकर, दिलीप काळे, रमेश काळे, सुनील कुंजीर, देवाअप्पा नखाते, श्रीधर वाल्हेकर, बजरंग नढे, सुदाम नखाते, मोहन कस्पटे, गणेश कस्पटे, दिलीप जाधव, संगीता पवार, विद्या माचुत्रे, सखुबाई नढे, विजय काळे, शरद नखाते, लहू कोकणे, काळुराम काळे आदी या वेळी उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष बाबासाहेब तापकीर आणि बेबीताई तापकीर या दाम्पत्याचा विशेष सत्कार करण्यात आला.

बालवयातील संस्कार परिणामकारक
ज्ञानेश्‍वर महाराज म्हणाले की, बालवयात होणारे संस्कार हे अधिक परिणामकारक असतात. ते आईवडिलांकडून होत असतात. संस्कार म्हणजे शिस्त, विनम्र भाव, थोरामोठ्यांचा आदर, माणुसकी, संस्कार ही एक मनाची परिभाषा आहे. मनाची अवस्था आहे. ‘स्व’ पासून सुरू होणारा संस्कार कुटुंबाला, समाजाला, राष्ट्राला आदर्शाप्रत पोहचवू शकतो.