मुलगी झाल्याने आईनेच जिवंत पुरले!

0

कोल्हापूरमधील घटना

कोल्हापूर । कोल्हापूरमधील वलीवडे इथं घडलेल्या एका हृदद्रावक घटनेतून त्याचीच प्रचिती आली आहे. दुसरीही मुलगीच झाली म्हणून जन्मदात्रीनं आपल्या आईच्या मदतीने तिला जिवंत पुरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुदैवानं, नवजात बालिकेला जिवंत बाहेर काढण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

सारिका मोरे ही लखन मोरेचे दुसरी बायको. लखनला पहिल्या पत्नीपासून चारही मुलीच झाल्या. त्यामुळे तिला माहेरी पाठवून यानं सारिकाशी लग्न केलं. लखनला तिच्यापासून मुलगाच हवा होता. पण, सारिकाला मुलगी झाली आणि लखनचा तीळपापड झाला. नवर्‍याच्या भीतीने तिने पुन्हा नशीब अजमावायचं ठरवलं. त्यावर, पुन्हा मुलगी झाली तर नांदवणार नाही, अशी धमकी लखननं दिली होती. पण, सारिकाला दुसरीही मुलगीच झाली. ही गोष्ट लखनला कळली तर आपला संसार मोडेल, या विचारानं सारिका आणि तिची आई हताश-हतबल झाल्या होत्या. त्या अवस्थेत त्यांनी नवजात मुलीला संपवायचं ठरवलं.

सारिका आणि तिची आई नकुशा भोसले यांनी या चिमुरडीला पोत्यात भरून रेल्वे रुळाजवळ खड्डा खणून त्यात पुरलं. तिथून परतत असताना परिसरातील महिलांना त्यांचं वागणं संशयास्पद वाटलं. त्यांनी माय-लेकीला खोदून विचारल्यावर त्यांनी सगळं खरं सांगितलं. त्यानंतर, पोलिसांच्या मदतीने महिलांनी नवजात बालिकेला खड्ड्यातून बाहेर काढलं आणि उपचारांसाठी सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. या हत्येच्या प्रयत्नाबद्दल गांधीनगर पोलिसांनी सारिका लखन मोरे आणि तिची आई नकुशा सिद्राम भोसले या दोघींवर गुन्हा दाखल केला आहे.