मुलगी पाहायला आले; लग्नच करून गेले…

0

सणसवाडी । सध्या लग्नसराई सुरू झाली असून उपवर मुला-मुलींसाठी स्थळ पाहण्याचे काम चालू आहे. बराच काळ विवाह जमवण्यात तसेच जमल्यानंतर विवाहाचे नियोजन करण्यात दिवस जातात. परंतु शिक्रापूर येथे बौद्ध समाजातील दोन परिवारांनी मुलगी पाहायला येताच कशाचीही अपेक्षा न करता त्वरित लग्न उरकून घेत समाजाला एक आगळावेगळा संदेश दिला आहे.

शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे मूळचे बीड जिल्ह्यातील रामा इंगळे यांचा परिवार राहत असून त्यांची मुलगी स्वाती हिला पाहण्यासाठी भोसरी येथील नारायण मनवर व त्यांचे कुटुंब व नवरदेव दशरथ आले होते. मुलगी पाहण्याच्या कर्यक्रमात एकमेकांची पसंती झाली आणि मुलगी पाहताच आपल्याला कशाचीदेखील अपेक्षा नसून आपण लगेच साखरपुडा करून घेऊन असे काही पाहुण्यांनी सांगितले. त्यांनतर साखरपुड्याची तयारी सुरू झाली आणि साखरपुडा कार्यक्रमासाठी म्हणून जवळील काही पाहुणे बोलाविण्यात आले. यावेळी शिरूर तालुका रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष नवनाथ कांबळे, पुणे प्रादेशिक बाजार समितीचे संचालक बाळासाहेब चव्हाण, सोसायटीचे चेअरमन विठ्ठल सोंडे, रमेश गडदे, अशोक शेलार, रजनीकांत ओव्हाळ, बाळासाहेब पंडित, गणेश केदारी, नितीन गायकवाड, राजेश म्हस्के, भीमराव खरात, अतुल थोरवे यांसह नवरी मुलगी स्वाती व नवरदेव दशरथ यांचे काही नातेवाईक होते, यावेळी काही नातेवाइकांनी साखरपुडा सुरू असतानाच लग्नदेखील उरकण्याची सूचना केली. लगेचच मंगल परिणय करण्यास आमची काही हरकत नसल्याचे सांगितले, यावेळी सर्वांनी त्या निर्णयाचे स्वागत करत लगेचच बौद्धाचार्य महादेव इंगळे गुरुजींना विवाह संपन्न करण्यास सांगितले. योग योग जुळवून आलेल्या रेशीमगाठी निमित्त सर्वानी आनंद व्यक्त केला. पुणे प्रदेशिक बाजार समितीचे संचालक बाळासाहेब चव्हाण यांनी दोन्ही परिवारांचे आभार मानले.