पुणे । राष्ट्रीय चर्मकार महासंघ पुणे यांच्या वतीने ‘मुलगी वाचवा मुलगी जगवा, मुलगी शिकवा’ या जनजागृती रॅलीचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. यंदा अनेक गणपती मंडळांचे 125 वर्ष आहे. याचेच औचित्य साधून या रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये 125 मुली सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या हातात ‘मुलगी वाचवा, मुलगी जगवा, मुलगी शिकवा’ असे विविध जनजागृती करणारे फलक देण्यात आले होते. त्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. या रॅलीत नू. म. वि. प्रशाला – कनिष्ठ महाविद्याल्याच्या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. ढोल ताशाच्या गजरात व विविध घोषणांनी दगडी नागोबा चौकातील संत देवजीबाबा मंदिरापासून या रॅलीची सुरुवात करण्यात आली. यावेळी आमदार मेधा कुलकर्णी, प्रसिद्ध गायक राजेश दातार, राजाभाऊ पोटे आदी मान्यवर उपस्थित होते.
मानाचे पाच गणपती तसेच साईनाथ ट्रस्ट मंडळ, अखिल मंडई गणपतींचे दर्शन घेऊन या रॅलीची सांगता करण्यात आली. या रॅलीमध्ये अनेक महिला तसेच पुरुषांनी देखील सहभाग घेतला होता. तसेच राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पदाधिकारी श्रीरंग अबनावे, प्रकाश खडतरे, राजूशेठ पवार, गोरख शिंदे, भरत कारंडे तसेच सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजक व राष्ट्रीय चर्मकार महासंघ पुणे अध्यक्ष राजाभाऊ पोटे यांनी केले.