मुलभूत सुविधांचीच वानवा!

0

रावेत (उमा माळी ): बर्‍याच वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवड महानगरपालीकेत वाल्हेकरवाडीचा समावेश होऊनसुद्धा म्हणावा तसा विकास झालेला नाही. मुलभूत सुविधांची नागरिकांना अजूनही प्रतीक्षाच आहे. चिंचवड, रावेत, आकुर्डी या तिन्ही नगरांच्या त्रिवेणी संगमावर वसलेल्या या उपनगराच्या पदरी, मात्र विकासाच्या बाबतीत निराशाच पडली आहे. प्राधिकरण व महानगरपालिका यांच्या हद्दीवर वसलेले हे उपनगर असून हद्दीचा वाद असल्यामुळे ते कायम दुर्लक्षितच राहिले आहे. अनेक प्रश्‍न आ वासून उभे आहेत. पिंपरी-चिंचवड ही कामगारांची नगरी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे महाराष्ट्रातील विविध भागातून कामगारांची, मजुरांची इकडे धाव असते. कमी भाड्यात चांगले घर रहायला मिळते. म्हणून या ठिकाणी रहायला लोक प्राधान्य देत होते. सध्या मात्र, येथील मुलभूत सोयीसुविधा पाहूनच लोक कचरू लागले आहेत.

अंतर्गत रस्त्याची दुरावस्था
मुख्य रस्ते चांगले असले तरीही अंतर्गत रस्त्यांची मात्र अत्यंत बिकट परिस्थिती आहे. खराब व अरुंद रस्त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. महानगरपालिका व प्राधिकरणाच्या समन्वयाच्या अभावी या परिसराकडे कायमस्वरूपी दुर्लक्ष करण्यात आले आहे. काही काही ठिकाणी रस्ते उखडून खडी वर आलेली आहे तर काही ठिकाणी मधोमध खड्डे पडले आहेत. त्यात पाणी साचून नागरिकांच्या आरोग्यास धोका संभवत आहे. तर स्वामी विवेकानंद नगरात आजपर्यंत अंतर्गत रस्त्यांना डांबरीकरण करण्यात आलेले नाही. जेष्ठ नागरिक, लहान मुले यांना चालण्यासाठी रस्ते धोक्याचे झाले आहेत काही ठिकाणी पाण्याच्या पाईपचे लिकेज झाल्यामुळे पाण्याचा अपव्यय तर होतोच. त्याचबरोबर पूर्ण रस्त्याने पाणी वाहून जाते. रस्त्यावर वाहनाची प्रचंड गर्दी, लहान मुलांची नेहमी ये-जा असते, तर दुसरीकडे शाळेला जाणार्‍या मुलांची घाई गर्दी, रस्ते अरुंद असल्यामुळे अवजड वाहने जात नसतानाही तसेच आतून नेण्याच्या वाहनचालकांचा प्रयत्न असतो. त्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. दुचाकीस्वार चालक आपल्या मनमानी नुसार गाड्या चालवत असतात. त्यामुळे किरकोळ स्वरूपाचे अपघात होत आहेत. नागरिकांनी काही ठिकाणी गतिरोधक उभारली असून ती गतिरोधक उंच स्वरुपाची असून त्यामुळे वाहनचालकांना त्रास होत आहे. कचर्‍याचा प्रश्‍न हि आणखी मार्गी लागला नसून दररोज त्यात वाढ होतच आहे.

अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट
वाल्हेकरवाडी येथे काही वसाहतीमध्ये रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी,तीनचाकी आणि चार चाकी वाहने उभी असतात त्यामुळे नागरिकांना चालणे सुद्धा अवघड झाले आहे या परिसरात काही अनुचित प्रसंग घडल्यास अत्यावश्यक सेवा पोहचणे सुद्धा अवघड आहे.2000 ते 2005 या कालखंडात वाल्हेकरवाडी चे नागरीकरण झपाट्याने वाढले जवळच पिंपरी व चिंचवड औद्योगिक केंद्र असल्यामुळे नागरिकांची व कामगारांची निवासासाठी वाल्हेकरवाडी ला पसंदी दिवसेंदिवस वाढत गेली नागरिकांची परिसराची पसंदी पाहून काही व्यवसाईकानी प्लॉट निर्माण केले हे करत असताना जागेच्या मूळ मालकाची दहा फुट व समोरासमोरील प्लॉट खरेदी करणार्‍यांनी आपल्या जागेतील प्रत्येकी अडीच फुट असे मिळून पंधरा फुटी रस्त्याचे नियोजन करण्यात आले असे काही ज्येष्ठ नागरिक सांगतात परंतु अनेकांनी आपल्या आर्थिक परिस्थिती नुसार अर्धा,पाऊण गुंठा जागा खरेदी केली प्रत्येकांनी अडीच फुट जागा रस्ता न सोडता आपल्या मार्गी प्रमाणे जास्तीत जास्त जागेचा बांधकामासाठी वापर केला.लोकसंख्या झपाटयाने वाढत गेली त्या बरोबर कुटुंबाच्या गरजा हि वाढल्या त्या मुळे आहे त्या जागेत मजल्यावर मजले वाढत गेले परंतु स्वतःचे वाहन उभी करण्यासाठी देखील जागा सोडण्यात आली नाही त्यामुळे आता अनेक वसाहतीमध्ये दुचाकी,तीन चाकी व चारचाकी वाहने रस्त्यावरच उभी केली जातात त्यामुळे रस्ता अरुंद होतो व इतर वाहन चालकांना वाहन चालविणे अवघड होते.गेल्या काही दिवसापासून परिसरात गुन्हेगारी वाढत असल्याने परिसरात पोलीस गस्तीचे प्रमाण वाढवण्यात आले आहे परंतु अरुंद रस्त्यामुळे पोलीस वाहन आत मध्ये घेवून जाता येत नाही त्या मुळे गुन्हेगारांचे फावते.