मुलभूत सुविधांसह शिक्षण,पर्यावरणावर भर

0

स्थायी समिती सभापती अ‍ॅड.शुचिता हाडा यांनी मनपाच्या अंदाजपत्रकात प्रस्ताविक केली 155 कोटींची वाढ

जळगाव : महानगरपालिकेचे सन 2019-2020 चे सुधारित आणि 2020-2021 चे मुळ अंदाजपत्र सादर करण्यासाठी शुक्रवारी स्थायी समितीची विशेष सभा झाली. यावेळी प्रशासनाने सादर केलेल्या 1141 कोटींच्या अंदाजपत्रकात उत्पन्न आणि खर्च लक्षात घेवून 154 कोटी 90 लाखांची वाढ प्रस्तावित करत 1291 कोटी 76 लाखांचा सभापती अ‍ॅड.शुचिता हाडा यांनी सादर केलेला अर्थसंकल्प सर्वानुमते मंजुर करण्यात आला. जळगाव शहर विकासाच्या आणि महानगरपालिकेच्या उत्पन्नवाढीच्या अनुषंगाने अर्थसंकल्प असल्याचा विश्‍वास सभापती अ‍ॅड.हाडा यांनी व्यक्त केला. अ‍ॅड.हाडा यांनी शहरातील बगीच्यासह शिवाजी उद्यान विकसीत करुन त्याठिकाणी थीम पार्क,बटरफ्लॉय ,बॉटनिकल उद्यानासाठी 5 कोटींची तरतूद करण्यात आली. शहरातील रस्त्यांची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. त्यामुळे रस्ते दुरुस्तीसाठी 15 कोटी,नवीन रस्त्यांसाठी 70 कोटींची तरतूद करुन मुलभूत सुविधांसह शिक्षण,पर्यावरणावर भर देण्याचा अंर्थसंकल्पात प्रयत्न केलेला आहे. मनपाच्या अंदाजपत्रकासाठी शुक्रवारी स्थायी समितीची विशेष सभा सभापती अ‍ॅड.शुचिता हाडा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी व्यासपीठावर उपायुक्त अजित मुठे, मिनिनाथ दंडवते,मुख्यलेखा परिक्षक संतोष वाहुले,मुख्यलेखाअधिकारी कपील पवार,सहाय्यक आयुक्त पवन पाटील,श्री.डोईफोडे,नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते. प्रशासनाने महानगरपालिकेचे सन 2019-2020 चे सुधारित आणि 2020-2021 चे मुळ अंदाजपत्र 1141 कोटींचे सादर केले होते. यावर सभापती अ‍ॅड.शुचिता हाडा यांनी जमा आणि खर्चामध्ये वाढ प्रस्तावित केली.

प्रशासनाने जमा लेखाशिर्षात 67 कोटी 76 लाख प्रस्तावित केले होते. त्यात 154 कोटी 90 लाख वाढ करुन 221 कोटी 33 लाख प्रस्तावित केले.तर खर्चात प्रशासनाने 40 कोटी 61 लाख प्रस्तावित केले होते. त्यात 238 कोटी 56 लाख वाढ करुन 279 कोटी 17 लाख प्रस्तावित केले आहे.मनपाच्या मुळ अंदाजपत्रकासह शासकीय निधी,मनपा निधी आणि शिलकी रकमेसह 1291 कोटी 67 लाखांचा अर्थसंकल्प सभापती अ‍ॅड.शुचिता हाडा यांनी सादर केला.

उत्पन्नवाढीसाठी सभापतींनी सुचविल्या उपाययोजना

मालमत्ता वसुली मनपाचे आर्थिक स्त्रोत आहे. मालमत्ता कराची 53 कोटी27 लाखांची मागणी आहे.मात्र प्रत्यक्ष मागणी आणि प्रशासनाने केलेली तरतूद यात तफावत आढळून येत असल्याने नवीन सर्वेक्षण करुन मागणी बिले दिल्यास मालमत्ता करात 27 कोटींनी वाढ होवून 80 कोटींची वसुली होऊ शकते. अनियमीत बांधकाम नियमाने नियमित करुन देण्यासाठी प्रिमीयम आणि दंड आकारणी करावी.अनधिकृत गुंठेवारी नियमीकरण, ले आऊट डीमार्केटेट नियमित करुन देण्यास आकारणी करावी,बांधकाम परवानगीच्यावेळी साहित्य साठवणूक शुल्क आकारण्यासाठी नगररचना विभागाने कार्यवाही करावी. त्यामुळे जवळपास 19 कोटी उत्पन्न मिळू शकते.फुले मार्केट आणि सेन्ट्रल फुले मार्केटमधील गाळ्यांचे नुतनीकरण केल्यास 18 कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळू शकते.गाळ्यांचा घसारा वजा जाता येणार्‍या किमतीवर 5 टक्के गाळे हस्तांतरण शुल्क आकारणी केल्यास जवळपास 5 कोटी उत्पन्न होवू शकते.अशा उत्पन्नाच्या उपाययोजना सभापती अ‍ॅड.हाडा यांनी अंदाजपत्रकात प्रस्तावित केल्या आहेत.

प्रभाग समिती कार्यालय होणार मिनी मनपा

शहरातील मनपाचे चारही प्रभाग समिती कार्यालयांचे रुपांतर मिनी मनपा करण्यासाठी सभापती अ‍ॅड.हाडा यांनी 25 कोटी 15 लाखांची तरतूद प्रस्तावित केली.मनपाचे केेंद्रीकृत खुला भुखंड विभागाचे प्रभाग समिती निहाय विभागणी करण्यात येवून विकेंद्रीकरण करण्यात यावे, बांधकाम विभाग,आरोग्य विभाग,लाईट विभाग,पाणी पुरवठा विभाग, घरपट्टी, खुला भुखंड, अग्निशमन, अतिक्रमण विभाग प्रभाग अधिकार्‍यांच्या अधिपत्याखाली करण्यात यावे.त्यामुळे सर्व सेवा प्रभागातच मिळणे शक्य होणार असल्याचे अ‍ॅड. हाडा यांनी प्रस्तावित केले. तसेच पिंप्राळा परिसरातील सोमाणी व्यापारी संकुलातील पहिल्या मजल्यावर मनपाचे रुग्णालय निर्माण करावे असेही सुचविले. किरकोळ वसुली विभाग आणि गाळे भाडे वसुली विभाग स्वतंत्र निर्माण करण्याचे प्रस्तावित आहे.

नवीन रस्त्यांसाठी 70 कोटींची तरतूद

मनपाच्या अंदाजपत्रकात मुलभूत सुविधांसह पर्यापरणावर भर देण्यावर सभापती अ‍ॅड.शुचिता हाडा यांनी प्राधान्य दिले आहे. स्मशानभूमीत मोफत लाकडे पुरविण्यासाठी 50 लाखांची तरतूद केली आहे. बालगंधर्व खुले नाट्यगृह दुरुस्तीसाठी 50 लाख, शहरातील बगीच्यासह शिवाजी उद्यान विकसीत करुन त्याठिकाणी थीम पार्क,बटरफ्लॉय ,बॉटनिकल उद्यानासाठी 5 कोटींची तरतूद करण्यात आली. शहरातील रस्त्यांची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. त्यामुळे रस्ते दुरुस्तीसाठी 15 कोटी,नवीन रस्त्यांसाठी 70 कोटी,गटारी दुरुस्तीसाठी 6 कोटी 20 लाख,नवीन गटारींसाठी 14 कोटी,व्यापारी संकुलांच्या दुरुस्तीसाठी 5 कोटी,नगरसेवक निधीसाठी 4 कोटी,पर्यापरणासाठी 1 कोटी 76 लाखांची तरतूद करुन एप्रिल ते मे महिन्यात मालमत्ता कराचा भरणा करणार्‍या मिळकतधारकांना जून महिम्यात एक वृक्ष देवून सन्मानित करण्याची सभापती अ‍ॅड.हाडा यांनी संकल्पना मांडली. क्रीडा स्पर्धा व योग प्रशिक्षणासाठी 5 लाखांची तरतूद, आरोग्य विभागाचे वाहन खरेदी आणि अग्निशमन विभागात फोम फायटर खरेदीसाठी 7 कोटी 50 लाख, ब्राम्हणसभेजवळ रेल्वेचा बोगदा तयार करण्यासाठी 10 कोटी,शहरात दिशादर्शक फलक लावण्यासाठी 2 कोटी,मनपाच्या सर्व कार्यालयात सोलर पॅनल उभारण्यासाठी 2 कोटी,पाणीपुरवठा दुरुस्तीसाठी 3 कोटींची तरतूद प्रस्तावित केली आहे.