मुलभूत सुविधांसाठी नागरिकांसह नगरसेवक आंदोलनाच्या पावित्र्यात

0

प्रभाग 18 मधील शोकांतिका ः अस्वच्छतेसह नादुरूस्त रस्त्यामुळे नागरिकांचा संताप

जळगाव– अनेक वर्षापासून मुलभूत सुविधा नाही, सुविधा मिळत नसल्याने यंदा प्रभागातून तीन एमआयएमचे नगरसेवक महापालिकेवर पाठविले. मात्र अद्यापही सुविधांची वाणवा आहे. प्रभागात कचर्‍याचे साम्राज्य पसरले आहे. गटारी नियमित स्वच्छता होत नाही. तसेच मुख्य रस्त्याचे बारा वाजले असून त्यामुळे विविध आजारांचा सामना करावा लागतोय. नागरिक नगरसेवकांकडे तक्रार करतात, नगरसेवक महापालिकेच्या सभेत या तक्रारीसाठी तसेच सुविधा मिळाव्यात यासाठी भांडतात यानंतरही सुविधा मिळत नाहीये. शहरतील इतर ठिकाणांप्रमाणे आम्ही कर भरतो, मग आमच्यावर अन्याय का? अशा शब्दात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. तसेच भावी काळात सुविधा न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दस्तुरखुद्द नगरसेवकांनीच दिला आहे. प्रभागात सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी येथील स्थानिक नगरसेवकच आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.

नादुरूस्त रस्त्यांमुळे आजारांचा धोका

प्रभाग क्रमांक 18 मध्ये एमआयडीसी, गुरुकूल सोसायटी, गणेशपूर, संतोषी माता नगर, मास्टर कॉलनी, शेरा चौक, अक्सानगर, रामेश्वर कॉलनी (पश्चिम भाग), लक्ष्मीनगर या परिसराचा समावेश आहे. जनशक्तिच्या टीमचे सोमवारी या प्रभागात पाहणी करुन येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. या प्रभागात कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. या बाजार समितीच्या बाजूने थेट मेहरुणपर्यंत जाणारा मुख्य रस्ता आहे. मात्र अनेक वर्षापासून या रस्त्याचे काम झालेले नाही. मोठ मोठ्या खड्डयांमुळे अपघात नित्याचेच झाले आहे, तसेच रस्त्यामुळे उडणारी धूळ यामुळे श्वसनाचे आजाराचा धोका वाढला असून अनेक या आजारांना सामोरे जात असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या.

विकासकामात दुजाभाव

इतर प्रभागाप्रमाणे येथील नागरिकही नियमित कर भरतात. कृषी उत्पन्न बाजार समिती असलेला हा महत्वाचा परिसर आहे. कर भरुनही सुविधा मिळत नाही. शहरातील अन्य प्रभागांपेक्षा या प्रभागाला सुविधांच्या बाबतीत दुजाभाव का केला जातो? असा संतप्त सवालही येथील नागरिकांनी उपस्थित केला. इतर नाही पण किमान मुलभूत सुविधा तर द्या, अशी अपेक्षा व्यक्त केली.

परिसरातील स्वच्छता रामभरोसे?

या प्रभागात नेमके साफसफाई कामगारांची कागदोपत्री आकडेवारी मोठी आहे. प्रत्यक्षात कधी तरी 10 ते 12 सफाई कामगार येतात. त्याच्यांकडून नियमित स्वच्छता होत नाही. कचरा कुंड्या नाहीत, कचरा उचलण्यासाठी घंटागाडी येत नाही. गटारींची साफसफाई होत नाही. ज्या गटारींची साफसफाई केल्यावर काढलेला कचरा उचलला जात नाही. त्यामुळे दुर्गंधी तसेच डासांचा प्रादुर्भाव यामुळे जगणे असह्य झाले असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. डेंग्यूची साथ असल्याने धुरळणी, फवारणीही केली जावी, अशी मागणी नागरिकांनी केली.

नागरिकांसह नगरसेवकांच्या तक्रारींना केराची टोपली

अनेक वर्षापासूनचा नादुरूस्त रस्ता, गटारींची सफाई नाही, नियमित स्वच्छता नाही. अशा एक ना अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत समस्यांबाबत रोजच नागरिक नगरसेवकांकडे तक्रारी करत आहे. या तक्रारीबाबत नगरसेवकही महापालिका तसेच लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करत आहे. मात्र नगरसेवकांच्या तक्रारींना केराची टोपली दाखविली जात आहे. नागरिकच नव्हे तर नगरसेवकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याने येथील नागरिकासह नगरसेवक आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचा इशारा दिला आहे.