मुलभूत सुविधांसाठी रोझवा प्लाटधारकांचे उपोषण

0

तळोदा । तालुक्यातील रोझवा प्लॉट येथील ग्रामस्थांनी गांवात मूलभूत सोयी सुविधा मिळाव्यात व गावांचा विकास कामांना खीळ घालणार्‍या ग्रामसेवकावर कारवाई व्हावी यामागणीसाठी आजपासून पंचायत समिती कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू केले. तालुक्यातील धवळीविहिर ग्रुप ग्रामपंचायतीत रोझवा प्लॉट या गांवाचा समावेश असून या गांवात कोणत्याही मूलभूत सोयी सुविधा, पाणी पुरवठा, रस्ते, शौचालये, गटारी आदी कामे झालेली नाहीत. 2015 पासून येथील ग्रामस्थ मूलभूत सोयी सुविधांची मागणी करीत आहेत.

गटविकास अधिकार्‍यांच्या पत्रास केराची टोपली
ग्रामसेवकाविरोधात ग्रामस्थांनी वारंवार उपसरपंच हिरालाल पाडवी यांच्या नेतृत्वात गटविकास अधिकारी तळोदा यांना निवेदने दिली. गटविकास अधिकार्‍यांनी ग्रामसेवकास कार्यवाहीचे आदेश दिले. परंतु, ग्रामसेवकाने गटविकास अधिकार्‍यांच्या आदेशांना वारंवार केराची टोपली दाखवली. उपसरपंच व ग्रामस्थांनी 16 सप्टेंबर व 10 ऑक्टो 2017 रोजी तक्रारी अर्ज दिले. यावर कार्यवाही झाली नाही म्हणून 15 फेब्रु 2018 रोजी आमरण उपोषण सुरू केले. त्यावेळी गटविकास अधिकारी शरद मगर यांनी 15 दिवसांत गावांच्या समस्या सोडविण्याचे लेखी आश्‍वासन देऊन कार्यवाहीचे पत्र ग्रामसेवक ए. आर. निकम यांना दिले. परंतु, ग्रामसेवक निकम रोझवा प्लॉट येथील कोणतेही सार्वजनिक काम होऊ देत नाही तसेच दीड महिन्यात गटविकास अधिकार्‍यांनी दिलेल्या पत्रांवर कार्यवाही केली नाही. म्हणून ग्रामसेवक ए. आर. निकुंभ यांच्यावर कारवाई करावी. आजपासून उपसरपंच हिरालाल पाडवी यांच्यासह यशवंत पाडवी, वनराज नाईक, छोट्या पाडवी, दिलवर पाडवी, राजेश पाडवी व असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. तालुक्यातील विविध आदिवासी सामाजिक संघटनांनी सुद्धा पाठींबा देत उपोषणात सहभाग दिला.