मुलभूत सुविधा नाहीत, सांगा आता कसे दिवस जगायचे ?

0

प्रभाग 9 मधील नागरिकांचा रोष: पथदिव्यांअभावी सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

जळगाव-शहराच्या पिंप्राळा उपनगरात जेव्हा पासून या परिसरात नागरी वस्त्या झाल्या आहेत, तेव्हा पासून इतर सुविधांचे सोडा, पण मुलभूत सुविधा नाहीत. रस्त्यांची दुर्दशा, उघड्यावर गटारी, पथदिवे, स्वच्छता नाही अशा प्रकारे गेल्या 10 ते 20 वर्षापासून सुविधांअभावी वनवासात आहे. मत मागायला आले की, आश्वासन देतात, त्यानंतर नगरसेवक फिरकूनही पाहत नाहीत. त्याचप्रमाणे नियमितपणे सफाई होत नाही, सफाई कर्मचार्‍यांना जाब विचारल्यास तुमच्या बापाचे नोकर आहेत काय? अशा उर्मट भाषेत बोलतात.नगरसेवकही ऐकून घेत नाहीत. त्यामुळे सांगा आता कुणाकडे तक्रारी मांडायच्या, आणि कसे जगायचे अशा संतप्त प्रतिक्रिया प्रभाग 9 मधील नागरिकांनी व्यक्त केल्या.

कर भरुनही स्वतः करावी लागतेय साफसफाई

प्रभाग 9 मध्ये निवृत्तीनगर,मुक्ताईनगर, पिंप्राळा,दांडेकरनगर,द्रोपदीनगर,अष्टभूजानगर या परिसराचा समावेश आहे. पिंप्राळा उपनगरात जनशक्तिच्या टीमने गुरुवारी पाहणी केली. या परिसरात अनेक ठिकाणी रस्त्याची दुर्दशा आहे, खड्डयात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी परिस्थिती आहे. पायी चालणेही अशक्य आहे. वृध्द रस्त्यात चालतांना जागीच कोसळतात, पडतात. स्वच्छतेचीही वाणवा आहे. पाच ते सहा दिवसात एकदा घंटागाडी येते, सफाई कर्मचारी तर येतच नाहीत. दहा वर्षापासून सफाई कर्मचारी येत नसल्याने मी स्वतःच हाती झाडू घेवून परिसर स्वच्छ करत असल्याची प्रतिक्रिया येथील एका माजी सैनिकाने दिली. तर दुसरीकडे घंटागाडी नियमित येत नसल्याने अनेक दिवस कचरा साठवून ठेवावा लागतो, उघड्यावर कचरा टाकता, येत नाही मग तो किती दिवस घरात साठवून आजारांना निमंत्रण द्यायचे? असेही येथील महिलांनी भावना व्यक्त करत मनपा प्रशासनावर नाराजी व्यक्त केली.

उघड्या व जीर्ण गटारींमुळे आरोग्य धोक्यात

प्रभागात नवीन गटारी नाही, ज्या आहेत त्याही फुटक्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात किंवा इतरवेळी गटारी तुंबल्या की, सांडपाणी रस्त्यावर येते, त्यामुळे दुर्गंधी पसरते. त्याप्रकारे उघड्या जागांवर झाडेझुडपे वाढल्याने डासांचा प्रादुर्भाव होत असून आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत लोकप्रतिनिधींना सांगितले असता, ते तुम्हीच साफसफाई करुन घ्या, अशा शब्दात उत्तरे देतात. रस्त्याच्या मधोमध टाकलेले कलव्हर्ट चुकीच्या पध्दतीने असल्याने अपघातांना निमंत्रण देत आहेत. डेंग्यूची साथ असतांना किमान इतर काही नको पण अशा वेळी फवारणी तर करण्यात यावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केलीे.

खांब टाकले, प्रत्यक्षात पथदिवे कधी लावणार?

नागरी वस्तीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. नागरिक करही नियमित भरतात , त्यानुसार त्यांना सुविधा देणे अपेक्षित आहे. मात्र मुलभूत सुविधाही मिळत नाही, अशी खंत येथील नागरिकांनी व्यक्त केली. परिसरात अनेक वर्षाच्या मागणीनंतर वीज खांब टाकण्यात आले. केवळ वीज खांब उभे असून त्यावर पथदिवे कधी लावणार याचे उत्तर प्रशासनाकडेही नाही, लोकप्रनिधीकडेही नाही. झाडेझुडपांमुळे साप,विंचू यांचा दंश होवून दुर्घटना घडण्याची शक्यता आहे, तसेच अंधारामुळेच सुरक्षिततेचाही प्रश्न ऐरणीवर असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.

.. तर निधी खर्च होतो कुठे?

शासनाकडून दरवर्षी मुलभूत सुविधांसाठी निधी मिळतो. निवडणूक आली की, उमेदवार मत मागायला येतात, त्यावेळी जास्तीत जास्त निधीतून विकासकामे करुन देण्याचे आश्वासन देतात, मात्र निवडून आल्यावर सुविधा देणे तर सोडाच , प्रत्यक्षात फिरकूनही पाहत नाहीत. मुलभूत सुविधांसाठी आलेला निधी दुसर्‍या कोणत्या ठिकाणी खर्च होतो, किंवा तो खर्च का केला जात नाही, ते खर्च न करणार्‍या प्रशासनातील अधिकार्‍यांवर लोकप्रतिनिधींवर कारवाई व्हावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली.