धुळे । गुजर खर्दे ता.शिरपूर येथे नवीन लेआऊट मंजूरी देतांना रस्ते,गटार, वीज या मुलभूत सुविधा न देता ग्रामपंचायत व पंचायत समीतीने विकासकाला सनद दिली. तरीही रहिवासी नागरिकांना दंडासहित कर वसूलीच्या नोटीस बजावल्या. कर भरूनही ग्रामपंचायतीने रहिवासींना मूलभूत सुविधा पुरवल्या नाहीत. ले आऊट विकासकांकडून लाच घेऊन सनद देणारे आधिकारी रहिवासींना वारंवार नोटीसा देऊन भय दाखवतात. चोर तो चोर, उपर से शिरजोर. अशा भ्रष्ट आधिकार्यांविरोधात कडक कारवाई करण्यासाठी, सक्तीची करवसूली थांवण्यासाठी,ताबडतोब मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी गुजर खर्दे येथील रहिवासी डॉ सरोज धोंडू पाटील या बुधवार 29 मार्च रोजी सकाळी 11वाजेपासून पवन नगरमधे आमरण उपोषण करीत आहेत.
दुपारी 2.30 वाजता ग्रामसेवक,सरपंच,उपसरपंच यांनी उपोषणस्थळी भेट दिली. आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. दोन महिन्यात रस्ते व गटारीचे काम करू असे तोंडी आश्वासन देऊन गेले. परंतु डॉ सरोज पाटील यांनी मागणी पूर्ण होईपर्यंत उपोषण चालू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. याआधी सरोज पाटील यांनी 20मार्च रोजी प्रांताधिकारी शिरपूर व 22 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी धुळे यांना समक्ष भेटून निवेदन दिलेले आहे. पण आश्वासनाखेरीज काहीही काम केले नाही. काम न करता आधिकारी नागरिकांची लूटमार करीत आहेत म्हणून सरोज पाटील यांच्या आंदोलनाला नागरिकांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे.