गेल्या 37 वर्षांपासून मी शिक्षण क्षेत्रात आहे. तर पत्नी सुनीता गेल्या 10 वर्षांपासून छोट्या मुलामुलींच्या घरगुती अभ्यासवर्ग घेत असल्याने त्यांच्याबरोबर, त्यांचे विविध प्रश्न समजावून घेत ‘उत्तर’ शोधतेय. जे उत्तर शोधण्याचे काम ती दररोज व मेहनतीने करतेय. असो मूळ विषयाकडे वळू या. मुलाचं ‘वाढणं’, आईबाबांचं ‘बघणं’ आज खूप गरजेचं झालेय. नव्हे तो महत्त्वाचा भाग झालाय. मी ‘महत्त्वाचा’ एवढ्यासाठी म्हणतोय की, गेल्या 6 वर्षांपासून मी केसीई सोसायटीतर्फे एक बिनखर्चीक पण ‘घर-शाळा-अभ्यास लेकरं’ आईबाबा’ यांची सांगड घालणारा ‘गल्ली तुमची, पालक सभा आमची’ हा उपक्रम (पत्नीबरोबर) राबवतोय. खरंच पाहिलं तर ‘राबवतोय’ हा शब्द तसा चुकीचा, योग्य शब्द अनुभवतोय.
मी अनुभवतोय लेकरांचं वाढणं ते आमच्या चिरंजीवांबरोबर हर्षवर्धनबरोबर आज तो 31 वर्षांचा आहे. जेव्हा आम्ही अंबरनाथ (जि. ठाणे) येथे राहत होतो. तेव्हा तो एक वर्षाचा होता. पुढे ‘बालवाडी’साठी तो काही काळ थत्ते काकू यांच्या घरगुती ‘शाळेत’ गेला व खूपशा गोष्टी अनुभवत अंबरनाथच्या नगरपालिकेच्या बालवाडी भगिनी मंडळाच्या मराठी शाळेत चक्क सातवीपर्यंत शिकला व 8 वी ते 10 वीसाठी कानसाई येथील परांजपे हायस्कूलमध्ये दाखल झाला. त्याचा हा शालेय प्रवास अभ्यास, खेळणं, फिरणं, बागेत बागडणं, लोकलने फिरणं, नातेवाइकांकडे जाणं, छोटी छोटी पुस्तक (ठकठक, चंपक, चाचा चौधरी व इतर गोष्टींची पुस्तकं) वाचणं आम्ही दोघं त्यांच्या वयाचे होत (दररोज) अनुभवत होतो. खूपच्या गोष्टी नव्याने शिकत होतो. आईजवळ बसत अभ्यास करणारा हर्षवर्धन माझ्यासमवेत खेळायला, फिरायचा व जर काही ‘अडचण’ आलीच तर अभ्यासाला बसायचा अन्यथा न सागंता तो अभ्यासासह त्यांची सारी कामं करायचा कधी तरी वार्षिक परीक्षेत वर्गात पहिला आला म्हणून डोळ्यात आनंदाश्रू आणत रडायचाही. विविध, मैदानी खेळ खेळत मित्रांमध्ये रमायचा, पुढे तो जसजसा ‘वाढत’ गेला व वरच्या इयत्तांमध्ये गेला तसा आम्ही त्याचा एक मित्रमैत्रिणींच्या (9वी, 10 वीत) ग्रुप तयार करत, तो आमच्या घरी बोलवत, काही विषयांच्या अभ्यास घेत छानसा जवळ आणला. जो प्रयोग खरंच प्रयोगच होता. पण ‘आपण सारे हुशारच आहोत’ हा आत्मविश्वास देणारा होता. (आज त्या ग्रुपमध्ये सर्वच ‘टॉप’ला जात छानशी नोकरी करत ‘संसारी’ माणसं झालीयेत. ज्यांना आम्ही कधी तरी भेटतो) असो.
लेकरांच्या मेंदूत काय भरावं, कसं भरावं, कोणत्या गोष्टी केव्हा सांगाव्यात, सांगून येत आणि त्यांना हुशार, व्यवहारी माणूस म्हणून घडावावं याचे खूपसं प्रयोग आपल्याच समाजात झाले आहेत. प्रयत्न केले आहेत. अजूनही करत आहेत. तेव्हा ‘प्रयोग’ करत लेकरांना वाढवणं व्हायला हवे. त्यासाठी संवाद व्हायला हवा. तोही घरात, प्रत्येक घरात, कारण घर आहे आद्य विद्यामंदिर, माणसाला शिक्षण देणार्या ज्या तीन संस्था आहेत. त्यात पहिला नंबर आहे. घराचा, दुसरा शाळेचा तर तिसरा समाजाचा. तेव्हा, लेकराचं घर मग ते कसंही असो ते त्याला प्रिय असतं. घरात त्याला सुरक्षितता वाटते, कारण तिथे आपल्यावर प्रेम करणारी माणसं असतात व ती आईवडिलांवर भाऊ-बहीण, आजी, आजोबा वगैरे असतात हे त्याला माहीत असते. थोडक्यात, कोणत्याही शाळेत किंवा कोणत्याही शिक्षकाला देता येणं शक्य नाही ते शिक्षण, संस्कार लेकरांना घरात मिळते. घर ही मुलांची खरी पहिली शाळा. बारीकसारीक गोष्टींची तोंडओळख मुलांना प्रथम घरातच होते. पुढे शाळेत गेल्यावर मुलांचं विश्व वाढतं.
मुलांचं ‘विश्व’ वाढाव’ त्याचा एक छानसा ग्रुप होत ते वेगळ्या विचाराने पुढे जावे म्हणून गेल्यावर्षी मी. गु.प.वि.पाटील प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथीतील 25 विद्यार्थ्यांना एक ‘जादा’ वा वेगळा वर्ग घेतला होता. ‘होल ब्रेन लर्निंग’ असं त्या वर्गाचं नाव होतं व ती कल्पना मला सुचली होती ती डॉ. श्रुती पानसे यांच्या एका पुस्तकावरनं पण त्या 25 विद्यार्थ्यांनी अनेक दिवस जे विविध उपक्रम ग्रुपद्वारे केले ते खरंच ‘घडवणारे’ होते व मलाही दररोज ‘शिकवणारे’ होते. शेवटी एका कवितेचा आभार घेत सांगायचं, तर ‘आपल्या मुलांची वेदना हाच अनुभव आहे. वेदनेचा. आपल्या स्वत:च्या वेदनेत बरीच भेसळ आहे आणि इतरांच्या वेदना तर खर्याच नव्हेच’ तेव्हा घरात नकारात्मक बोलणं टाळत आपण जर ‘थोड कौतुकाचं’ समजुतीचं, समजावून घेण्याचं बोलतो. तसा संवाद साधला व लेकरांना त्यांच्या जबाबदार्या समजावून सांगितल्या तर त्याचं ‘वाढणं’ हे बघण्यासारखं असतं!
– चंद्रकांत भंडारी,जळगाव
9890476538