जुन्नर । राष्ट्रपिता विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविण्याकरीता शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन करावे. बालवैज्ञानिक निर्माण होण्यासाठी विज्ञान प्रदर्शन हे महत्त्वाचे आहे, असे मत गटशिक्षणाधिकारी के. डी. भुजबळ यांनी व्यक्त केले. जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघ व पंचायत समिती जुन्नरच्या संयुक्त विद्यमाने तालुका विज्ञान प्रदर्शनाच्या नियोजनाची सभा खानापूर येथील शिवनेरी फाउंडेशनच्या सभागृहात संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. विस्तार अधिकारी खोडदे, प्रा. राजेंद्र मुरादे, प्रा. अमोल थोरात, प्रा. ज्ञानेश्वर पटाडे, महेंद्र गणपुले, रतिलाल बाबेल, वाय. बी. दाते, टी. आर. वामन आदींसह सर्व शाळांचे मुख्याध्यापक व विज्ञान शिक्षक उपस्थित याप्रसंगी होते.
थर्माकोलचा वापर टाळण्याच्या सूचना
समाजोपयोगी, दर्जेदार व सृजनशीलता वाढीस लावणारे प्रकल्प विज्ञान प्रदर्शनात आणावेत, असे आवाहन के. डी. भुजबळ यांनी केले. या प्रसंगी जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष रतिलाल बाबेल यांनी पर्यावरण समतोल राखण्यासाठी व प्रदूषण कमी करण्यासाठी विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी थर्माकोलचा वापर टाळण्याच्या सूचना केल्या. तसेच तालुक्यातील सर्व शाळांची प्रकल्प नोंदणी ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
24 व 25 नोव्हेंबरला विज्ञान प्रदर्शन
43 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन 24 व 25 नोव्हेंबर रोजी खानापूरमध्ये शिवनेरी फाउंडेशनच्या कार्यालयात करण्यात आल्याची माहिती तालुका विज्ञान अध्यापक संघाचे सचिव टी. आर. वामन यांनी दिली. तालुकास्तरावर विज्ञान प्रदर्शनासाठी शाश्वत विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम असा मुख्य विषय असून आरोग्य आणि सदृढ आरोग्य, संसाधन व्यवस्थापन आणि अन्न सुरक्षा, कचरा व्यवस्थापन, वाहतूक व दळणवळण, डिजीटल व तांत्रिक समाधान, गणितीय प्रतिकृती असे सहा उपविषय देण्यात आले आहेत. या प्रदर्शनासाठी 1 ली ते 8 वी, 9 वी ते बारावी, शिक्षक गट, आदिवासी गट असे विविध गट करण्यात आले आहेत.