मुलांचे भविष्य उज्वल करण्यासाठी स्व:ताचे आयुष्य झिजवणार्‍या मातांचा सन्मान

0

पुणे । आयुष्यात आलेले अनुभव सांगताना दाटलेला कंठ… मुलांना लहानाचे मोठे करताना सोसलेले कष्ट विसरत चेहर्‍यावर उमटलेले स्मित हास्य… स्वत: अशिक्षित असल्यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी जिद्दीने केलेले प्रयत्न सांगताना त्या माऊलींच्या डोळ्यात अश्रू तरळले. संसाराचा गाडा ओढताना मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कोणी सावित्री झाली तर कोणी झाशीची राणी, त्यांचे सुख-दु:खांनी भरलेले ते अनुभव ऐकताना उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा देखील पाणावल्या. मुलांचे भविष्य उज्वल करण्यासाठी स्व:ताचे आयुष्य झिजवणार्‍या बारा मातांचा सन्मान करण्यात आला. मनातले भाव अभंगातून व्यक्त करीत विठ्ठूनामाच्या गजरात हा हृदयस्पर्शी सोहळा पार पडाला.

बारा कर्तृत्ववान मातांचा गौरव
मंडई गणपती मंदिरासमोरील साखरे महाराज मठ येथे श्री ज्ञानेश्‍वरी वाचन मंदिर (पुणे) आणि मातृगौरव न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने कृष्णानंद सरस्वती यांच्या पुण्यस्मरणदिनानिमित्त बारा कर्तृत्ववान मातांच्या गौरव करण्यात आला. यावेळी ह.भ.प. डॉ. किसनमहाराज साखरे उपस्थित होते. लक्ष्मीबाई कातुरे, कलावती नाशीककर, अलका समेळ, मधुमालती गायकवाड, नलिनी पवार, नर्मदा खेडेकर, कल्पना केणी, हेमलता जगताप, लता थोरवे, मनाली शिरगोपीकर, स्वप्नाली मोरे, सुमन मोरे या ज्येष्ठ कर्तृत्ववान मातांचा सन्मान करण्यात आला. सन्मानपत्र, उपरणे, तुळशी वृंदावन, मिठाई असे पुरस्काराचे स्वरुप होते. सन्मान सोहळ्याचे यंदा 17 वे वर्ष होते.

आईची सेवा करा
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असे म्हटले जाते ते सत्यच आहे. वेद पुराणात देखील मातेला प्रथम स्थान देत, मातृ देव भव असे सांगितले आहे. आई हेच सर्वश्रेष्ठ वैभव असून प्रत्येकाने आईप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करायला हवी. वृद्धावस्थेत आपल्या आईची सेवा करणे, हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे, असे ह.भ.प.डॉ. किसनमहाराज साखरे यांनी यावेळी सांगतिले.

विविध गणेशोत्सव मंडळांचे सहकार्य
सन्मानाला उत्तर देताना स्वप्नाली मोरे म्हणाल्या, पतीच्या मृत्यू नंतर मुलांना वाढविण्यासाठी खूप कष्ट सोसले. परंतु स्वत:ची जिद्द, चांगल्या लोकांची साथ मला मिळाली म्हणून मी अनेक संकटांना सामोरी जाऊ शकले. पराग ठाकूर, आनंद सागरे, विनायक घाटे, संदीप गायकवाड, कल्याणी सराफ, विनायक मोडक यांसह विविध गणेशोत्सव मंडळांचे कार्यक्रमाला सहकार्य लाभले. विनया देसाई यांनी सूत्रसंचालन केले. आनंद सराफ यांनी प्रास्ताविक केले.