मुलांच्या जडणघडणीची जबाबदारी शाळा-कॉलेजबरोबरच पालकांचीही!

0

डॉ. संभाजी मलघे यांनी व्यक्त केले मत

पिंपरी : मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाची व जडणघडणीची जबाबदारी फक्त शाळा किंवा कॉलेजवर नसते. शाळा-कॉलेज बरोबरच पालकांची देखील असते. कुटुंबात मुलांच्या जडणघडणीसाठी पोषक वातावरण आज कमी होत चालले आहे. त्यात टी.व्ही. मोबाईलमध्ये अडकलेले पालकांना पाहून मुलांवर तेच संस्कार होत असतात. मुलांचे व्यक्तिमत्वाला शाळा-कॉलेजमध्ये आकार मिळात असतात. मात्र त्यांच्यावर मुळ संस्कार घरातूनच होत असतात, असे मत इंद्रायणी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि डी.वाय. पाटील कॉलेज यांच्यावतीने आयोजित ‘व्यक्तिमत्व विकास’ विषयावरील कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. मलघे बोलत होते.

विद्यार्थ्यांनांत संवाद साधावा
डॉ. मलघे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण कुटुंब, शाळा- महाविद्यालय आणि समाज या तीन घटकांद्वारे होत असते. कुटुंबात पालकांचा मुलांसोबत सुसंवाद असणे गरजेचे असते. मुलांनी देखील मोबाईल, टी.व्ही.चा अतिरिक्त वापर टाळून आई-वडील-बहीण-भावाशी संवाद साधला पाहिजे. आज कुटुंबात संवाद अपुरा होत असल्यामुळे त्याचा परिणाम मुलांच्या व्यक्तिमत्वावर होताना दिसतो आहे. शाळा-महाविद्यालात विद्यार्थ्यांना मित्रपरिवार लाभतो. ‘कॉलेज कट्टे’ दिसून येतात. यातून मुलांनी चांगल्या गोष्टी आत्मसात करून आपले व्यक्तिमत्व घडवावे.

व्यक्तिमत्वाबद्दल सांगताना डॉ. मलघे म्हणाले की, ज्यांना उत्तम भाषण व संभाषण करता येते, ते लोक आपल्या मनातील विचार व भावना स्पष्टपणे व्यक्त करू शकतात. अशाच लोकांना समाजात मान्यता लाभू शकते. व्यक्तीचे व्यक्तिमत्व म्हणजे त्याचे केवळ दिसणे किंवा रुप नव्हे तर त्याच्याकडे किती तीव्र बुद्धीमत्ता, आचार विचार आणि समाजाशी किती नाळ जुळलेली आहे, यावर व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाची गणना होत असते. देशात-परदेशात ज्या ज्या व्यक्तींनी छाप पाडली, ते सर्व लोक विद्वान होते. डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम, मोरारजी देसाई, डॉ. राजेंद्रप्रसाद हे सारे लोक बुद्धीमान होते. त्यांनी नवा समाज घडवला. त्याचे कारण त्यांचे विचारशील व्यक्तिमत्व.

खर्‍या गुणांची कदर म्हणजे व्यक्तिमत्व
डॉ. रणजीत पाटील यांनी सांगितले की, विद्यार्थी कोणत्याही शाखेचा असो, त्याला आज पुढे जाण्यासाठी चांगले बोलणे, चालणे, व्यासंग या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. विद्यार्थ्यांच्या खर्‍या गुणांची कदर म्हणजे त्याचे व्यक्तिमत्व होय. डॉ. गायकवाड यांनी प्रास्ताविकामध्ये कार्यशाळेचा हेतू स्पष्ट केला. यावेळी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. रणजीत पाटील, संयोजक डॉ. श्याम गायकवाड, कुलसचिव डी.डी. गायकवाड आदी उपस्थित होते.