भिवंडी । भिवंडीतील फेणे गाव हनुमान शेठ चाळीत मिना दिनेश यादव गेली 7 ते 8 वर्षापासून कुटूंबासमवेत राहत आहेत. 17 सप्टेंबर रोजी दोघे कामावर गेले असता त्यांचा मुलगा धीरज यास प्रथमदर्शनी कुत्रा चावला असे भासविण्यात आले होते. मृत्यूपूर्व जबानीत मुलाने सलमान नावाच्या मुलाने आपणांस मारले असे सांगितले. जखमी अवस्थेत मुलाला इंदिरा गांधी रूग्णालयात दाखल केले. त्यावेळी मुलाच्या शरीरावर चाकूने वार केलेल्या जखमा होत्या. पुढील उपचारासाठी ठाण्याच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये नेत असताना उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून आपणांस न्याय द्यावा असा तक्रार अर्ज भिवंडीचे उपायुक्त यांच्याकडे मिना यादव यांनी दाखल केला आहे. मिना यादव यांना कुठूनही न्याय मिळत नाही म्हणून अखेर भारतीय कम्युनिष्ठ पक्ष, ठाणे जिल्हा कॉन्सिलचे जिल्हा सेक्रेटरी कॉमेड विजय कांबळे यांच्या सहकार्याने पोलीस उपायुक्त कार्यालयात तक्रार अर्ज दाखल केला आहे. तक्रारीत त्या म्हणतात की आम्ही मोल मजूरीचे काम करीत असताना आम्हाला निरोप आला की तुमच्या मुलाला कुत्रा चावला आहे. हे ऐकताच घरी धाव घेतल्यानंतर लोकांनी मुलाला इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले असल्याचे सांगितले.
सलमान मारल्याचा आरोप
हॉस्पिटलमध्ये मुलाची भेट घेऊन त्याच्याकडे विचारणा केली असता आपणास सलमान याने मारले व पाईप वरून ढकलून दिले असे सर्वांसमक्ष सांगितले. प्रकृती गंभीर बनल्याने डॉक्टरांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितले. रूग्ण वाहिकेत आपल्या मांडीवर घेतलेल्या मुलाच्या शरीरावर कुत्रा चावल्याच्या दाताच्या किंवा नखांच्या खुणा नव्हत्या तर चाकूने मारलेल्या जखमा दिसत होत्या असा आरोप केला आहे. कुत्रा चावल्याचा बनाव करण्यात आला कारण मुलाने मृत्युपूर्वी आपणांस सलमानने मारले असल्याचे सांगितले होते.
भारतीय कम्युनिष्ठ पक्ष, ठाणे जिल्हा कॉन्सिलचे जिल्हा सेक्रेटरी कॉ. विजय कांबळे यांना विचारले असता ते म्हणाले मोलमजुरी करणार्या महिलेस कुठूनही न्याय मिळाला नाही. अखेर आमच्या कार्यालयात आल्या असता त्यांच्याकडून सर्व प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली आणि पोलीस उपायुक्त कार्यालयात दाखल केलेल्या तक्रार अर्जातील मजकूर वाचला असता पोलिसांनी या प्रकरणी तातडीने तपास करून गरीब महिलेस न्याय द्यावा तिच्याकडे फोटोही उपलब्ध आहेत. महिलेच्या तक्रारीवरून तपासाअंती खुनाचा गुन्हा दाखल करणे आणि मारेकर्यांवर कठोर कारवाई करणे यात दिरंगाई झाल्यास पक्षातर्फे महिलेस न्याय मिळावा म्हणून कठोर आंदोलन छेडले जाईल याची नोंद घ्यावी असेही ते म्हणाले.