मुलांच्या स्वप्नपूर्तीसाठी पालकांनी दिला पाहिजे पुरेसा वेळ

0

पुणे । विद्यार्थ्यांनी लहानपणापासूनच मोठी स्वप्ने बघायला हवीत. जिद्द, चिकाटी, आत्मविश्‍वास आणि कठोर मेहनतीच्या बळावर ही स्वप्ने पूर्ण होतात. मुलांच्या या स्वप्नपूर्तीसाठी पालकांनीही पुरेसा वेळ दिला पाहिजे. पालक आणि मुले यांच्यातील संवाद आयुष्याच्या यशात महत्त्वाचा ठरतो, असे मत युएसके फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. उषा काकडे यांनी व्यक्त केले.कर्वे रस्त्यावरील संस्कार मंदिर वारजे संचलित महर्षी कर्वे विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण नुकतेच कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झाले. त्यावेळी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप बराटे, खजिनदार अविनाश जाधव, शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल शिंदे आदी उपस्थित होते.

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रयत्नशील
बराटे म्हणाले, समाजातील गोर-गरीब, वंचित घटकांतील मुलांच्या शिक्षणासाठी संस्था काम करीत आहे. परिस्थितीशी लढणार्‍या या विद्यार्थ्यांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आधुनिक काळात प्रत्येकाने संगणकाची कास धरली पाहिजे. नवे तंत्रज्ञान अवगत करून त्याचा दैनंदिन जीवनात योग्य उपयोग केला पाहिजे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशव गुंजाळ यांनी केले. अविनाश जाधव यांनी आभार मानले.

कल्पना शक्तीला वाव दिला पाहिजे
डॉ. काकडे म्हणाल्या, आयुष्य जगताना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. मात्र, अनुभवाचे शिक्षण घेत त्यावर मात करता येते. शिक्षकांच्या मार्गदर्शनाबरोबरच पालकांचा आधार मुलांना या वयात हवा असतो. सद्यस्थितीत लहान मुलांना अनेक गोष्टी सतावत असतात. अशावेळी पालकांनी त्यांच्याशी नियमित संवाद ठेवला पाहिजे. अपेक्षांचे ओझे न ठेवता, त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव दिला पाहिजे.

स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने आयोजित विविध स्पर्धांतील विजेत्यांना डॉ. उषा काकडे यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. मार्च, 2017 मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळालेली इंद्रायणी इंगळे, व्दितीय क्रमांक नितीन लोंढे, तृतीय क्रमांक खुशबू चौरासिया यांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले. वंचित घटकांतील मुलांच्या शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या या शाळेतील विविध उपक्रमांचे कौतुक करीत पुढील कार्यासाठी डॉ. काकडे यांनी 5 लाखांची देणगी दिली.