मुलांना नवे कपडे घेत दसरा साजरा अन् दुसर्‍याच दिवशी पित्याची आत्महत्या

0

पिंप्राळ येथील घटना ; सेंट्रींग कामगाराने घेतला गळफास

जळगाव – पिंप्राळ्यातील चिंचपुरा भागातील ज्ञानेश्वर अशोक पवार (नाथजोगी, वय 35) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी 1.30 वाजता उघडकीस आली. मंगळवारी दसरा सण असल्याने मुलांना नवे कपडे आणून सायंकाळी हा सण कुटुंबियासमवेत साजरा केला. अन् दुसर्‍याच दिवशी पवार याने गळफास घेतला. या घटनेमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर हा वडील अशोक तुकाराम नाथजोगी, आई मंगलबाई, पत्नी मंजुळाबाई, मुलगी तेजस्विनी (12), मुलगी पूर्वा (5)व मुलगा पार्थ (2) यांच्यासोबत वास्तव्याला होता. पवार हे सेन्ट्रींगचे काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. बुधवारी दुपारी घरात कोणी नसताना त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. थोड्या वेळाने त्यांच्या पत्नी मंजुळाबाई घरात आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. मंजुळाबाई घरात आल्यानंतर त्यांनी दृष्य पाहताच धक्का बसला. आरडा-ओरड करुन त्यांची शेजारच्यांना बोलावले. यानंतर परिसरातील तरुणांनी पवार यांचा मृतदेह उतरवुन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला होता. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करुन पवार यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर रामानंदनगर पोलिस ठाण्याचे अनिल फेगडे, सुभाष सोनवणे यांनी पंचनामा केला. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दसरा सण केला उत्साहात साजरा
सेन्ट्रींगचे काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार्‍या पवार यांनी मंगळवारी उत्साहात दसरा सण साजरा केला. तीन्ही मुलांना नवीन कपडे खरेदी केले होते. पवार दाम्पत्याने जोडीने परिसरातील नातेवाईक, मित्रांना घरी जाऊन सोने दिले होते. आनंदात असलेल्या पवार यांनी अचानक अशा प्रकारे आत्महत्या केल्यामुळे पवार कुटुंबियांसह सर्वांनाच धक्का बसला. घटनेनंतर कुटुंबियांनी रुग्णालयात प्रचंंड आक्रोश केला.