हडपसर । शाळाबाह्य व गैरहजर मुलांना शालेय प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार्या वैभवी अंजीरराव कोल्हे या सातवीच्या विद्यार्थिनीची दिल्ली येथे होणार्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदेसाठी निवड झाली आहे. मांजरी खुर्द (ता. हवेली) येथील जिल्हापरिषद शाळेत ती शिक्षण घेत आहे. बंगळूर (कर्नाटक) येथे दीड महिन्यापूर्वी अशोका युथ व्हेंचरने आयोजित केलेल्या शिक्षण परिषदेमध्ये तिने प्रतिनिधित्व केले होते.
बांधकाम, वीटभट्टी व ऊसतोडणी मजुरांशी व मुलांशी संवाद
‘सेव्ह द चिल्ड्रन’ या संस्थेच्या माध्यमातून वैभवी मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्याचे काम करीत आहे. या कामासाठी तिने ‘शिक्षण प्रेरणा गटा’ची स्थापना केली आहे. ती शाळेत न येणार्या मुलांच्या घरी जाऊन व त्यांचे प्रबोधन करून त्यांना शाळेत जाण्यासाठी प्रेरणा देण्याचे काम करत आहे. बांधकामगार, शेतमजूर, वीटभट्टीवरील मजूर, ऊसतोडणी मजूर अशा स्थलांतरित होत असलेल्या पालकांशी व मुलांशी संवाद साधून त्यांना शाळेत पाठविण्याचे आवाहन ती करते. मुलांना आपल्याच भाषेत समजावून सांगून त्यांच्यासमोर भविष्यातील परिस्थिती मांडून शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याचे काम ती करतेक.
पहिल्या तीन विद्यार्थ्यांमध्ये तिची निवड
वैभवीच्या शिक्षण प्रेरणा गटाच्या कामाची दखल घेऊन ‘सेव्ह द चिल्ड्रेन’ संस्थेने बंगळूर येथील अशोका युथ व्हेंचरमधील सहभागासाठी तिची निवड केली होती. राज्यातून केवळ पाच विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यातही प्रतिनिधित्व करण्याचा मान तिला मिळाला. या परिषदेसाठी देशभरातून सव्वीस विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यातूनही पहिल्या तीन विद्यार्थ्यांमध्ये तिची निवड केली. पुढील महिन्यात दिल्ली येथे होणार्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदेसाठी तिची निवड झाली आहे. येथे तिचे सादरीकरण चांगले झाल्यास स्वीझर्लंड येथील जागतिक परिषदेतही प्रतिनिधित्व करण्याची संधी तिला मिळणार आहे. तिचे वडील ड्रायव्हिंगचे काम करतात. आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही ती नेटाने हे काम करत आहे. मुख्याध्यापक राजेंद्र ओव्हाळ, नेहा बनकर, सुनंदा यादव, शीतल तागडे यांच्यासह अनेक शिक्षक मार्गदर्शन करत आहेत.
स्थलांतरित मजुरांना शिक्षणाचे महत्त्व…
स्थलांतरित मजुरांच्या कुटुंबात शिक्षणाचे महत्त्व पोहचविण्याची गरज आहे. त्यांना अभ्यासाच्या पद्धती समजल्यास त्यांच्यात प्रगती होते. या कामाने मला आनंद मिळत आहे. यापुढेही हे काम नेटाने करण्याचा प्रयत्न राहील. त्यासाठी मला संस्था व शिक्षकांचे मार्गदर्शन मिळत आहे.
– वैभवी कोल्हे, विद्यार्थिनी