काशीनाथ पलोड स्कूलमधील प्रकार; संमतीपत्र न भरण्याची भूमिका
जळगाव: राज्य शालेय शिक्षण विभागाने नववी ते 12 वीचे वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा आदेश दिले आहेत. तत्पूर्वी पालकांकडून संमतीपत्र घेण्यास सांगितले आहे. परंतु, त्यासाठी पालक तयार नसल्याचे चित्र दिसू लागले आहे. विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमधील काही पालक हे संमतीपत्र भरून देऊन आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास तयार नसल्याची माहिती आहे. त्यामुळे या शाळेचे वर्ग शासनाच्या आताच्या आदेशानुसार पुन्हा उघडणार की नाहीत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ‘जनशक्ति’ने या संदर्भात संस्थेचे सचिव राजू ननावरे यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले की, काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवयाला तयार नाहीत ही गोष्ट खरी आहे. मात्र, शाळा सुरू करण्याचा निर्णय हा शासनाचा आहे आणि आम्ही फक्त या निर्णयाची अंमलबजावणी करत आहेत. एखाद्या पालकाला आपल्या मुलाला शाळेत पाठवायचे नसेल, तर हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे.