हडपसर । दिव्यांगांच्या गुणांचे कौतुक केले तर त्यांचा आत्मविश्वास वाढून ते स्वावलंबी होण्यास मदत होते. त्यामुळे पालकांनी या विशेष मुलांकडे दुर्लक्ष न करता त्यांना योग्य शिकवण व प्रेम दिल्यास ते अद्भूत प्रगती करतात. त्यासाठी पालकांना त्यांचे सुप्त गुण ओळखता आले पाहिजेत, असे मत बँक ऑफ बडोदाचे मुख्य प्रबंधक सुनील बळवंत यांनी व्यक्त केले.
बँक ऑफ बडोदाच्या 110 व्या स्थापना दिनानिमित्त हडपसरच्या शाखेने सोलापूर जिल्ह्यातील कोर्टी या गावातील ज्ञान प्रबोधन मतिमंद निवासी विद्यालयातील मुलांसोबत आनंद उत्सव साजरा केला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यांच्यासोबत गाणी, गप्पागोष्टी तसेच नृत्याचा कार्यक्रम झाला. मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. शाळेत फरशी लावण्यासाठी बँकेच्या वतीने मदत करण्यात आली. राजेश साळुंखे, प्रसाद बर्वे, सुरेश तिखे , गजानन नाईक, प्रज्ञा धिवर, व्ही. पी. माने, नारायण कांबळे, संस्थेचे संचालक रोहित बगाडे याप्रसंगी उपस्थित होते.