पुणे । पालकांना आपल्या मुलांनी प्रत्येक क्षेत्रात बाजी मारली पाहिजे, असे वाटत असते. परंतु प्रत्येक मूल हे वेगळे असते. तसेच मुलांमध्ये वेगवेगळी कौशल्य दडलेली असतात. त्यांच्यामध्ये असलेली ही कौशल्ये पालकांनी ओळखली पाहिजे आणि कौशल्ये विकसित करण्यासाठी साध्या, सोप्या पध्दतींचा अवलंब केला पाहिजे, असे मत बालरोगतज्ज्ञ डॉ. सुनील गोडबोले यांनी व्यक्त केले.सार्थक वेल्फेअर फाउंडेशनतर्फे आर्ट ऑफ स्मार्ट पॅरेंटिंग याविषयी व्याख्यानाचे आयोजन नवी पेठेतील पत्रकार भवन येथे करण्यात आले होते. यावेळी डॉ. सुनील गोडबोले आणि डॉ. अश्विनी गोडबोले यांनी उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले.
घरगुती गोष्टींमधून विविध प्रकारचे शिक्षण मिळू शकते
डॉ. सुनील गोडबोले म्हणाले, प्रत्येक गोष्टींमध्ये आपल्या मुलांची दुसर्याशी तुलना करणे पालकांनी सोडले पाहिजे. लहान मुलांना समजून घेण्यासाठी पालकांनी आपला थोडावेळ त्यांच्यासाठी देणे गरजेचे आहे. पालकांनी देखील मुलांबरोबर विविध खेळ खेळले पाहिजे. यामधून त्यांच्यामध्ये असलेली एखाद्या क्रीडाप्रकाराची आवड पालकांच्या लक्षात येईल. तसेच त्यांना घरगुती गोष्टींमधून देखील विविध प्रकारचे शिक्षण मिळू शकते.
चित्र, तक्ते, चिन्ह यांचा वापर करावा
ते म्हणाले, एखादी गोष्ट चित्र, तक्ते, चिन्ह अशा माध्यमांमधून लहान मुलांना पटकन कळते आणि ती लक्षात राहते. त्यामुळे लेखन, वाचन, गणिते या विषयांचा अभ्यास मुलांकडून करून घेताना पालकांनी त्यांना हे विषय वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करून शिकविल्या पाहिजेत. अशाप्रकारे त्यांच्याकडून अभ्यास करून घेतल्यास त्यांची स्मरणशक्ती वाढेल आणि त्यांना अभ्यासाची आवड देखील निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक वयोगटातील मुलांसाठी आणि पालकांसाठी सार्थक फाउंडेशन वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करणार आहे, असे संस्थेच्या संचालिका स्वाती नामजोशी यांनी सांगितले.