चाकण : ‘ब्ल्यू व्हेल’सारख्या घातक खेळांपासून मुलांना दूर ठेवायचे असेल तर, त्यांना पुस्तकांकडे वळविले पाहिजे. त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी पालकांनी पुढाकार घेतला पाहिजे. सार्वजनिक ग्रंथालयांनीदेखील ‘शाळा दत्तक उपक्रमा’च्या माध्यमातून मोलाचा वाटा उचलावा, असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ग्रंथालय माहितीशास्त्र विभागप्रमुख डॉ. राजेंद्र कुंभार यांनी केले. ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या वतीने ’शाळा दत्तक उपक्रम’ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
यांची होती उपस्थिती
पुणे विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक व शाळा दत्तक उपक्रमाचे (सोलापूर पॅटर्न) जनक दत्तात्रेय क्षीरसागर यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. ग्रंथमित्र धोंडिबा सुतार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी पुणे जिल्हा ग्रंथालय अधिकारी उज्ज्वला लोंढे, पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह सोपानराव पवार, विभागीय संघाचे कार्योपाध्यक्ष मोहन शिंदे, रमेश सुतार, राजेंद्र ढमाले आदी मान्यवर उपस्थित होते.
मोबाईलमुळे मुलांवर दुष्परिणाम
डॉ. राजेंद्र कुंभार पुढे म्हणाले, मुलांना वाचनाची आवड लागवी, यासाठी पालकांनीही पुस्तके वाचली पाहिजेत. पालकांचे अनुकरण मुले करतील. चांगले साहित्य ही ग्रंथालयांची प्रबळ बाजू आहे. मोबाईलमुळे मुलांवर दुष्परिणाम होत आहेत. मोबाईलच्या माध्यमातून संपर्कात राहणे, ही काळाची गरज असली तरी, मोबाईलचा अतिरेक टाळावा. पूर्वी खारीक, खोबरे असा चौकस आहार मुलांना खुराक म्हणून दिला जायचा. परंतु, आज स्मार्ट फोनमध्ये एक जीबी डाटा यासारखा खुराक मुलांना दिला जातो, ही चिंतेची बाब आहे, अशीही खंत डॉ. कुंभार यांनी व्यक्त केली.
ग्रंथालयांनी दायित्व पूर्ण करावे
यावेळी पुणे विभागाचे सहाय्यक संचालक दत्तात्रेय क्षीरसागर यांनीही मार्गदर्शन केले. सार्वजनिक ग्रंथालयांनी आपली कार्यक्षमता वाढवून समाजाप्रति असलेले आपले दायित्व पूर्ण करावे. तरच समाज आपली दखल घेईल, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उज्ज्वला लोंढे यांनी केले. दिलीप भिकोले यांनी सूत्रसंचालन केले. तर, ग्रंथालय निरीक्षक संजय ढेरे यांनी आभार मानले.