बारामती । मुलांची वाढ होताना त्यांना व्यवस्थित समजून घेणे गरजेचे असते. मुलांच्या निकोप वाढीसाठी त्यांच्यासमवेत सतत संवाद साधत राहणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मनोविकास तज्ज्ञ व समुपदेशक डॉ. अर्चना सावंत यांनी केले. विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी सकारात्मक पालकत्व या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. सावंत बोलत होत्या. प्राचार्य राधा कोरे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले.
वेगवेगळ्या वयोगटांत मुलांची शारीरिक व मानसिक वाढ होत असते. अनेकदा या त्यांच्या स्वभावावरही होत असतो. त्यामुळे मुलांमधील बदल स्वीकारून पालकांनी त्यांच्याशी मित्रत्वाच्या नात्याने वर्तणूक करणे गरजेचे आहे, असे सावंत यांनी यावेळी सांगितले. मुलांशी उत्तम संवाद असला तर मुले मनमोकळेपणाने पालकांशी बोलतात. अनेकदा या बदलांमुळे मुलांमध्ये निराशा येण्याची भीती असते. या काळात मुलांना विश्वासात घेऊन त्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी पालकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. जीवन जगण्यासाठी ज्या अवांतर गोष्टींची गरज असते, त्या शिकवण्याचेही काम व्हायला हवे, असेही त्यांनी सांगितले. मनीषा चव्हाण यांनी परिचय करून दिला, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष अनिल रूपनवर यांनी आभार मानले.