पाटणा । स्वतःला सर्व मॉडर्न गोष्टी आवडतात पण घरात जर सून म्हणून मुलगी आनायची असेल तर ती मात्र एकदम संस्कारी हवी असते. असेच काहीसे बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवींचे झाले आहे. राबडीदेवी या आपल्या मंत्री असलेल्या मुलांसाठी ‘देशी’ सून शोधत आहेत. आपल्याला चित्रपट पाहायला जाणारी आणि मॉलमध्ये जाणारी सून नको. मुलांसाठी संस्कारी सून हवी असल्याची इच्छा त्यांनी रविवारी लालूप्रसाद यादव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलून दाखवली. राबडीदेवी आणि लालूप्रसाद यादव दाम्पत्यांचे चिरंजीव तेजस्वी यादव हे बिहारमधील नितीश कुमार सरकारमध्ये उपमुख्यमंत्री तर तेजप्रताप यादव हे आरोग्यमंत्री आहेत.
राबडीदेवींना 9 अपत्ये त्यामध्ये दोन मुले आणि सात मुली
या कार्यक्रमात त्यांना मुलांच्या लग्नाविषयी विचारण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी आपली ही इच्छा व्यक्ते केली. राबडीदेवी म्हणाल्या, माझी मुले ही खूप धार्मिक आहेत. त्यामुळे आम्हाला मुलांसाठी चांगल्या संस्काराची सून हवी आहे. आम्हाला चित्रपटगृहात आणि मॉलमध्ये जाणारी मुलगी नकोय. घराला पुढे नेणारी, मोठ्यांचा आदर करणारी हवी. आम्ही जसे आहोत, अगदी त्याप्रमाणे आम्हाला सून हवी असे त्या म्हणाल्या. लालूप्रसाद यादव आणि राबडीदेवींना एकूण 9 अपत्ये आहेत. यामध्ये दोन मुले आणि सात मुली आहेत. यादव दाम्पत्याचा सर्वांत लहान मुलगा तेजस्वी यांचा जन्म 9 डिसेंबर 1989 रोजी झाला होता. तर तेजप्रताप यांच्या जन्मतारखेवरून वाद आहे. बिहार निवडणुकीनंतर माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार लालूंचा मोठा मुलगा तेजप्रताप यांनी प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांचे वय तेजस्वी यादव यांच्यापेक्षा कमी असल्याचा दावा केला आहे.
दोन्ही मुलांना मंत्रिपद
वर्ष 2015 मध्ये लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल आणि नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने काँग्रेसबरोबर युती करून विधानसभा निवडणुका लढवत बहुमत प्राप्त केले होते. त्यानंतर स्थापन झालेल्या सरकारमध्ये त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना मंत्रिपद दिले होते. मंत्री बनल्यापासून या दोघांवर सातत्याने आरोपाच्या फैरी झडताना दिसत आहे. दोन्ही बंधुंनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्तीबाबत योग्य माहिती न भरल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यांना सतत वादात ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती असल्याप्रकरणी लालूप्रसाद यादव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.