नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे दुसरे सत्र गुरूवारी सुरू झाले. अधिवेशनाचे दुसरे सत्र सुरू होण्यापुर्वी पंतप्रधानांनी म्हटले की, यावेळेस सभागृहात चांगली चर्चा होईल व जीएसटी मार्गी लागले. राज्यसभेचे कामकाज दिवंगत सदस्यांना श्रध्दांजली अर्पण केल्यानंतर स्थगित करण्यात आले. तर लोकसभेत मध्यप्रदेशातील रेल्वे बॉम्बस्फोट, लखनऊमध्ये अतिरेक्यांशी झालेली चकमक, अमेरिकेतील भारतीयांवरील हल्ले यावर चर्चा झाली. यावेळी गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, या सर्व प्रकाराची चौकशी एनआयए करेल. तर लखनऊमध्ये मारला गेलेला अतिरेकी सैफुल्लाच्या वडिलांनी मुलगा अतिरेकी असल्याने त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. ते म्हणाले, सरकारला अशा पित्याचा अभिमान वाटतो.
मोठे संकट टळले
राजनाथ यांनी संसदेत माहिती देताना सांगितले की, एटीएसने कानपुर, लखनऊ, इटावा आणि मध्यप्रदेशच्या अनेक शहरातून सहा अतिरेक्यांना अटक केली. सैफुल्लाने एटीएसवर गोळाबार केला. त्यानंतरच त्याच्यावर कारवाई करण्यात आली. सर्व घटनांमध्ये राज्य पोलिस व केंद्रीय सुरक्षा यंत्रणांमध्ये चांगला ताळमेळ होता. दोन राज्याच्या पोलिसांनी त्वरित कारवाई केली आणि देशावर येणारे संकट त्यामुळे टाळता आले आहे.
एनआयए तपास करणार
नुकत्याच घडलेल्या सर्व अतिरेकी कारवायांचा तपास एनआयए करणार आहे. राजनाथ म्हणाले, मला इथे एक गोष्टी सांगणे महत्वाचे वाटते ते म्हणजे, उत्तर प्रदेश पोलिस जेव्हा मृत अतिरेकी सैफुल्लाच्या वडिलांना भेटले आणि त्याचा मृतदेह त्यांच्याकडे सोपवला तेव्हा त्याचे वडिल म्हणाले, जो देशाचा होऊ शकला नाही तो माझाही होऊ शकत नाही. त्याने कुठले चांगले काम तर केलेले नाही. मला त्याच्या मृतदेहाचा चेहराही पहायचा नाही. मी आयुष्यभर मेहनत करून कुटूंबाचे पोषण केले. परंतू सैफुल्लाने मला शरमेने मान खाली घालायला लावली. त्यांच्या या विचारामुळेच सैफुल्लाचे वडिल सरताज यांच्या बद्दल आम्हाला सहानभूती आहे. मला वाटते की सभागृहाने त्याच्या वडिलांप्रती सहानुभूती व्यक्त करावी. त्याच्या वडिलांना मी धन्यवाद देतो.
अमेरिकेतील भारतीयांवरील हल्ल्यांनंतरही मोदी गप्प का?
पाच राज्यातील निवडणुकांच्या रणधुमाळीनंतर गुरूवारपासून सुरू झालेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकसभेत विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्र सरकारला धारेवर धरले. अमेरिकेत भारतीयांवर होणार्या हल्ल्यांवरून विरोधकांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. पंतप्रधान मोदी प्रत्येक मुद्द्यावर ट्विट करतात. पण अमेरिकेत भारतीयांवर होणार्या हल्ल्यांबाबत चुप्पी का, असा सवाल काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.