मुलाची आत्महत्या, आईचाही ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

0

पिंपरी-चिंचवड : मानसिक आजाराने ग्रासलेल्या तन्मय दास गुप्ताने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलाच्या आत्महत्येच्या घटनेने आईलाही धक्का बसला. आईचाही ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. एकाच दिवशी मुलगा आणि आईचा मृत्यू झाल्याने गुप्ता कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. परिसरातही या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पिंपळे सौदागर येथे राहणाऱ्या तन्मय दास गुप्ता (वय ३६) याच्यावर दहा वर्षापासून मानसोपचार तज्ज्ञाकडून उपचार सुरू होते. त्याने गेल्या दोन महिन्यापासून गोळ्या घेतलेल्या नव्हत्या. सोमवारी रात्री आई शुक्ला दास गुप्ता या तन्मयला घेऊन डॉक्टरकडे गेल्या होत्या. त्यानंतर रात्री साडे अकराच्या सुमारास तो घरी आला आणि गळफास घेऊन आत्महत्या केली.

स्वतः च्या पोटच्या मुलाने आत्महत्या केल्याचे पाहून शुक्ला यांना हृदय विकाराचा झटका आला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. शुक्ला यांच्या पतीचे निधन झाले असून त्यांचा दुसरा मुलगा बेंगळुरू येथे राहतो. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तन्मयने आत्महत्या का केली हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.