मुलाच्या दुचाकीसाठी जमवलेले पैसे घेऊन चोरटा पसार

0

जळगाव। शाहुनगरातील कच्छी चाळीत राहणार्‍या इब्राहीम सिंकदर तडवी यांनी मुलाच्या दुचाकीसाठी जमा केलेले चाळीस हजार रुपये व तीन मोबाईल असा एकूण 44 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या उघड्या घरातून गुरूवारी मध्यरात्री चोरून नेल्याची घटना घडली आहे. दरम्यान, चोरट्यांनी कपाटातील लॉकरमधील तीनशे ते चारशे रुपयांच्या चिल्लर न चोरता चाळीस हजारांच्या रोकडवरच डल्ला मारला. परंतू शहरात मोबाईल व घरफोडीच्या घटनांमध्ये आता दिवसेंदिवस वाढ होतांना दिसत असून चोरट्यांना पोलिसांचा भयच उरलेला नाही.

कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकलेले
शाहुनगरातील कच्छी चाळ येथे इब्राहीम सिंकदर तडवी हे पत्नी अमिना, भाऊ युनुस व त्यांच्या पत्नी सलमा तसेच मुलांसोबत राहतात. तर पेंन्टर काम करून ते आपल्या कुटूंबियांचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान, ÷उन्हाळ्यामुळे उकाडा जाणवत असल्यामुळे गुरूवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास तडवी कुटूंबिय हे जेवण झाल्यानंतर घराचा दार उघडा ठेवून झोपून गेले. घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधत चोरट्यांनी घरात प्रवेश करत कपाट उघडून त्यातील लॉकर चावीने उघडून चाळीस हजार रुपये ठेवलेली पर्स चोरी केल्यानंतर किचनरूममध्ये ठेवलेले तीन मोबाईल घेवून पसार झाले. शुक्रवारी 26 रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास इब्राहीम तडवी यांच्या भावाच्या पत्नी सलमा बी यांना जाग आल्यानंतर त्यांनी मोबाईलची शोधा-शोध केली. मोबाईल सापडून न आल्याने त्यांनी कुटूंबियांना उठवून विचारणा केली. तडवी कुटूंबिय मोबाईल शोधत असतांनाच त्यांना लोखंडी कपाट उघडे दिसले आणि त्यातील कपडे अस्ताव्यस्त फेकलेेले दिसून आले. चोरी झाल्याचा संशय आल्याने त्यांनी कपाटातील लॉकर तपासले असता ते देखील उघडे होते व त्यातील 40 हजार रुपयांची रोकड मात्र चोरीला गेली होती. त्यानंतर किचनरूमध्ये ठेवलेले तीन मोबाईलही चोरीला गेल्याचे त्यांचे लक्षात आले.

घरात चोरी झाल्याची खात्री होताच इब्राहीम तडवी यांनी तात्काळ शहर पोलिस स्टेशन गाठत त्याबाबत माहिती दिली. यानंतर घटनास्थळी डिबी कर्मचारी गणेश शिरसाळे यांनी जावून पाहणी केली. त्यानंतर इब्राहीम तडवी यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी शुक्रवारी सकाळी दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

मुलाच्या दुचाकीसाठी जमवले पैसे
इब्राहीम तडवी यांनी मुलगा सलमान याला 12 वीत गेल्यानंतर दुचाकी घेवून देईल असे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून इब्राहीम तडवी हे पेन्टरींग कामातून मिळणार्‍या पैशातले काही पैसे मुलाच्या दुचाकीसाठी जमवत होते. तर सलमान हा देखील काम करून दुचाकीसाठी पेैसे जमा करीत होता. गेल्या वर्षभरात तडवी यांनी आपल्या बचतीतून चाळीस हजार रुपये जमवून ते कपाटातील लॉकरमध्ये ठेवले होते. परंतू गुरूवारी मध्यरात्री चोरट्यांनी ती रोकडच लांबविल्याने मुलाला दुचाकी घेवून देण्याचे स्वप्नच तडवी यांचे अपूर्ण राहिले.

चोरट्यांची कुणकुणही लागली नाही
तडवी कुटूंबिय रात्री घरात झोपलेले असतांना चोरट्यांनी दरवाजा उघडा असल्याची संधी साधत घरात प्रवेश केला. त्यानंतर इब्राहीम तडवी यांच्या पँन्टच्या खिशातून कपाटाच्या लॉकरची चावी काढून चोरट्यांनी लॉकरमधील चाळीस हजार लांबविले. चोरट्यांनी ईथच न थांबता चक्क झोपलेल्या कुटूंबियांना हळूच ओलांडून घराच्या आतील किचनरूमध्ये प्रवेश केला आणि त्या ठिकाणी ठेवलेेले मोबाईल चोरून नेले. घरात चोरटे घुसल्याची तडवी कुटूंबियांना कुणकुणही लागली नाही.